10 Habits of Successful People : आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हावंसं वाटतं. तुम्ही आजवर अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील; पण तुम्ही कधी हा विचार केला का, ते इथपर्यंत कसे पोहोचले असतील? या लोकांचे आपण खूप कौतुक करतो आणि त्यांच्यासारखे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो. पण, आपण अनेकदा अपयशी ठरतो. तुम्हाला माहीत आहे का की, यशस्वी लोकांची दिनचर्या आणि एकंदरीत त्यांच्या सवयी या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. यशस्वी लोकांच्या प्रत्येक कामात सातत्य असते आणि त्यामुळेच ते यशाचे शिखर गाठू शकतात.जर आपण एखादी गोष्ट सातत्यानं केली, तर ती तुमच्या सवयीचा भाग होते आणि मग या चांगल्या सवयी जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत आणल्या, तर खूप कमी काळातच तुम्हाला याचे फायदे दिसून येतील. एखाद्या गोष्टीची सवय व्हायला २१ ते ६६ दिवस लागू शकतात. प्रयत्न करून बघा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

manofmany या वेबसाइटनं एका वृत्तात पुराव्यांवर आधारित यशस्वी लोकांच्या १० सामान्य सवयी सांगितल्या आहेत. या चांगल्या सवयींच्या मदतीनं तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकता.

१. सकाळी लवकर उठा (गजर न लावता)

सकाळी लवकर उठणे ही खूप चांगली सवय आहे; पण अनेकांना सकाळी उठायला कंटाळा येतो. काही लोकांच्या आयुष्यातील अनेक दिवस आतापर्यंत झोपण्यात वाया गेले असतील. मित्रांनो, सकाळी लवकर उठायची सवय लावा. जर तुमच्याकडे शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य असेल, तर तुम्ही मनाप्रमाणे जगू शकता. जर तुम्ही सकाळी ६ वाजता उठत असाल, तर तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहात, असं समजावं आणि त्यात जर गजर न लावता तुम्ही सकाळी उठत असाल, तर ते अधिक चांगलं आहे. कारण- सकाळी गजर वाजल्यामुळे आपल्याला अधिक अस्वस्थता जाणवते आणि अनेकदा आपण अलार्म वाजल्यानंतरही उठलो नाही, तर निराश होतो. तुम्हाला हे कदाचित हास्यास्पद वाटेल; पण यशस्वी होण्यासाठी अलार्म न लावता, सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.

२. जास्तीत जास्त वाचन करा

असे म्हणतात, “वाचाल, तर वाचाल.” हे अगदी खरंय. वाचनामुळे आपला मेंदू प्रगल्भ होतो. दुपारचा वेळ घालविण्यासाठी पुस्तक वाचणं हा एक प्रभावी मार्ग आहे. पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली, तर त्याचे अनेक फायदे दिसून येतात.
सीएनबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती वॉरेन बफे सांगतात की, दररोज सकाळी वर्तमानपत्रे वाचून मी दिवसाची सुरुवात करतो. संपूर्ण दिवसभरात ते ८० टक्के वाचन करतात. ते सांगतात, “दिवसातून ५०० पानं वाचा; ज्यामुळे ज्ञान वाढेल. ज्ञान हे व्याजाप्रमाणे वाढत जातं. तुम्ही सर्व जण हे करू शकता; पण मला खात्री नाही की, प्रत्येक जण हे करतील.”
जर तुमच्या परिसरात स्थानिक वाचनालय असेल, तर आठवड्यातून एकदा तिथे जाऊन वेळ घालवा. नेहमी लक्षात ठेवा की, तुमचा मेंदू जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. मेंदूला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यामुळे जास्तीत जास्त वाचनावर भर द्या.

हेही वाचा : प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

३. नियमित व्यायाम करा

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात; पण नियमित व्यायाम करणं हा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. “आता वेळ नाही. नंतर जिमला जाऊन वर्कआउट करेन,” असं आपण सहजपणे म्हणतो. पण, जर शरीरासाठी तुम्ही एखादी विशिष्ट वेळ ठरवत नसाल, तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येणार नाही. ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि ते व्यायामासाठी आवर्जून वेळ काढतात.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना सकाळी ट्रेडमिलवर वर्कआउट करताना डीव्हीडी पाहून एकाच वेळी अनेक कामं करायला आवडतात. त्यामुळे वेळ कधीच मिळत नाही, तर वेळ स्वत:साठी काढावा लागतो.

४. दिवसातून १५ ते २० मिनिटे एकटे बसून स्वत:चा विचार करा

दररोजच्या आयुष्यात आपण स्वत:साठी कधीच वेळ काढत नाही; ज्यामुळे आपल्याला काय पाहिजे, याविषयी आपण नेहमी गोंधळलेले असतो आणि वेळ आली, तर योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. आपण ज्या अतिधावपळीच्या जगामध्ये वावरतो, त्यापासून थोडा ब्रेक घेऊन १५ ते २० मिनिटे स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. यशस्वी व्यक्तीची ती एक चांगली सवय आहे. स्वत:साठी वेळ काढणं आणि स्वत:बद्दल विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात आवश्यक असे बदल करून चांगला मोबदला मिळवू शकता.

‘लिंक्ड इन’चे सीईओ जेफ विनर नेहमी ध्यान करण्याचं महत्त्व सोशल मीडियावर सांगतात. ध्यानामुळे त्यांना रणनीती तयार करण्यास आणि सातत्यानं काम करण्यास ऊर्जा मिळते.
मित्रांनो, आयुष्य हे विमानाप्रमाणे आहे. इतरांना मदत करण्यापूर्वी तुम्ही स्वत:ची मदत करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे आहे, याचा विचार करण्यासाठी दिवसातून १५ ते २० मिनिटं एकटं बसून स्वत:चा विचार करा.

५. विश्लेषणात्मक दृष्टीने विचार करा

असं म्हणतात की, कोणतंही काम यशस्वीपणे करायचं असेल, तर त्यासाठी एक चांगली योजना आखावी लागते. जर तुम्हाला सतत एखादी समस्या येत असेल, तर त्याबाबत विचार करून विशिष्ट योजनेद्वारे ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला यश मिळू शकतं. जेव्हा तुमच्या वाटेत एखादा अडथळा येतो तेव्हा शांत बसा, विचार करा आणि समस्या सोडविण्यासाठी वेळ काढा. यश मिळवायचं असेल, तर नियोजन हा सर्वांत महत्त्वाचा पैलू ठरतो. ही सवय अंगीकारणं हा यशाकडे जाणारा एक उत्तम मार्ग आहे.

६. नेहमी प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा

संगत ही व्यक्तिमत्त्व वाया घालवणारी नाही, तर घडविणारी असावी. एकटं राहण्यापेक्षा चांगल्या संगतीत राहणं चांगलं आहे आणि तुम्हाला काय हवं आहे त्यानुसार तुमची संगत तुम्हाला ठरवावी लागते. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, आपली कमाई ही आपल्या पाच जवळच्या मित्रांची सरासरी असते. नैसर्गिकरीत्या आपण अशा लोकांच्या संपर्कात असतो, जे आपल्या समान पातळीवर आहेत; पण तुम्ही यापलीकडे विचार केला, तर तुम्हाला कदाचित चांगले मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्ती भेटू शकतात.
रोमन तत्त्वज्ञानी सेनेका सांगतात, “जेव्हा आपल्याला चांगली संधी मिळते, ते आपलं भाग्य असू शकतं; पण प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहाल, तर आपल्यासाठी संधीचं दार उघडू शकतं.” त्यामुळे आपल्या सहवासात राहणाऱ्या लोकांची निवड आपण विवेकपूर्वक केली पाहिजे.

हेही वाचा : पॉलिअ‍ॅमरी नातेसंबंध म्हणजे काय? पॉलिॲमरीची प्रकरणे दिवसेंदिवस का वाढत आहेत?

७. ध्येय ठरवा आणि त्याचा पाठलाग करा

यशस्वी लोकांमध्ये स्वप्नांना सत्यात बदलण्याची क्षमता असते. एखादी गोष्ट करायची म्हणून ठरवणं आणि त्यानंतर त्यासाठी जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत घेणं यात एक अतुलनीय आनंद असतो. ध्येयाचा पाठलाग करण्यापूर्वी तुम्हाला ध्येयाकडे नेणारा मार्ग शोधावा लागेल. अनेकदा तुमच्या पदरी अपयश येईल; पण खचून जाऊ नका. पडल्यानंतर पुन्हा उठा आणि ध्येयाचा पाठलाग करा. तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते कागदावर किंवा नोटबुकवर किंवा बोर्डवर लिहून ठेवा. त्यामुळे तुमच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते, जी तुम्हाला ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देते.

८. उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करा

तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ‘गिग इकॉनॉमी’विषयी ऐकलं असेल. गिग इकॉनॉमी म्हणजेच कंपन्या स्वतंत्र किंवा अल्प-मुदतीच्या कामगारांना नियुक्त करतात; ज्यामुळे त्यांना नोकरीवरून केव्हाही काढलं जाऊ शकतं. अशा वेळी एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं कठीण जातं. अशा वेळी उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करणं यशस्वी माणसाचं लक्षण आहे. हे आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे.
गुंतवणूक करणं, व्यवसाय सुरू करणं, पैशांची बचत करणं इत्यादी गोष्टींच्या मदतीनं तुम्ही उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करू शकता. गुंतवणूक तुम्ही कधीही करू शकता; पण ती करताना सावधगिरी बाळगा.

९. काटकसर करा; पण कंजुषी करू नका

काटकसर करणं आणि कंजुषी करणं यात फरक आहे. काटकसर करणं ही एक चांगली सवय आहे; जी अनावश्यक खर्च करण्याला आवर घालते. काटकसर करणारी व्यक्ती अंथरुण पाहून पाय पसरते.आर्थिक कुवत लक्षात घेऊन ही व्यक्ती पैसा खर्च करते; पण कंजूसपणा हा पैसे जमा करण्याच्या नादात स्वत:च्या गरजेसाठीही पैसा खर्च करू देत नाही.
काटकसर करणारे लोक यशस्वी होतात. ते पैशांच्या व्यवहारात हुशार असतात. त्यांना पैशांचं नियोजन करता येतं आणि पैशांची बचतसुद्धा करता येते. त्यासाठी आर्थिक नियोजन करणं हे एक उत्कृष्ट पाऊल आहे; ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र राहू शकता. पैसे खर्च करण्यास घाबरू नका. जगण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा पैलू आहे; पण तुमच्याकडे पैसा नसेल, तर खर्च करू नका.

१०. शेअर करा

नेहमी लक्षात ठेवा, आपण सर्व एक आहोत. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी तुमचं ज्ञान जगासमोर मांडायला कचरू नका. तुम्ही करीत असलेल्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. ज्ञान ही अशी एकमेव गोष्ट आहे की, ती दुसऱ्यांना दिल्यावर वाढत जाते.
जर तुम्ही सांगितलं की, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी काम करीत आहात, तर तुम्हाला तुमच्यासोबतचे लोक (कुटुंबीय, नातलग मित्र-परिवार इ.) ते काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सल्ले देतील; जे तुम्हाला उपयोगी पडू शकतात.
क्रिस रॉक सांगतात, “मी अनेकदा अपयशी ठरलो. जेव्हा आपण इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्हाला कोणीही मदत करीत नाही; पण जेव्हा तुम्ही स्वत:च्या बंद पडलेल्या गाडीला भररस्त्यात धक्का देत पुढे नेण्याचा प्रयत्न करता तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या इतर गाड्यांतील लोकही तुम्हाला मदत करायला पुढे येतात. जर तुम्हाला मदत हवी असेल, तर सर्वांत आधी तुम्ही स्वत:ला मदत केली पाहिजे.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 habits of successful people will change your life know more about these habits ltdc ndj
Show comments