Heart-friendly foods : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. व्यायामाचा अभाव, आहारात पोषक पदार्थांची कमतरता यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. चुकीची जीवनशैली व चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. परंतु, डॉक्टरांनी शिफारस केलेले काही पदार्थ खाल्ले, तर हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तसेच, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. ते पदार्थ कोणते आहेत, हे आज आपण जाणून घेऊ.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे छातीतील जळजळ कमी होते आणि रक्ताभिसरण सुधारते. हृदयाच्या जास्तीत जास्त फायद्यांसाठी ७०% किंवा त्याहून अधिक कोकोचा समावेश असलेले चॉकलेट खावे.
शेंगा
सूर्यफूल, सोयाबीन, वाटाणा, तसेच अनेक प्रकारच्या फळझाडांच्या बिया, मसूर व काबुली चणे यांमध्ये फायबर, प्लांट प्रोटीन्स व आवश्यक मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
ऑलिव्ह ऑइल
मेडिटेरियन आहारात प्रामुख्याने ऑलिव्ह ऑइलचा समावेश केला जातो. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
लसूण
लसणामध्ये औषधी गुणधर्म आहेत. लसणातील अॅलिसिन या संयुगामुळे रक्तदाब कमी करण्यास, रक्तप्रवाह वाढविण्यास व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. म्हणून लसणाचे सेवन हा हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित आरोग्य सुधारते आणि आजारांचा धोका कमी करता येतो.
बेरी
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी व रास्पबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि छातीतील जळजळ कमी करतात. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे बेरींचे नियमित सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारते.
पालेभाज्या
पालक, केल आणि इतर पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स व नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. जे रक्तदाब कमी करण्यास, तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
अक्रोड
अक्रोडमध्ये चांगले फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स व फायबर भरपूर प्रमाणात असतात. अक्रोडच्या सेवनाने हृदयाची कार्यक्षमता सुधारते. दररोज मूठभर अक्रोड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
ओट्स
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. ओट्स एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. दररोज एक वाटी ओटमिल खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगले राखता येते.
सॅल्मन फिश
मांसाहारी लोकांसाठी सॅल्मन फिश हा हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास व हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. आठवड्यातून दोनदा याचे सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहते.