देशभरात सुमारे ३७१ दशलक्ष व्यक्ती मधुमेहाने त्रस्त असून त्यातील निम्म्या प्रकरणांचे निदान अद्याप झालेले नाही. नाशिकमध्ये मधुमेहाने त्रस्त असलेल्यांची संख्या १५ टक्के आहे. असा निष्कर्ष ‘इंडस हेल्थ प्लस अ‍ॅब्नॉर्मॅलिटी’ अहवालात काढण्यात आला आहे.
इंडस हेल्थ प्लसने आपल्या वितरण भागीदार असलेले वोक्हार्ट रुग्णालय यांच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात  नाशिकच्या ३० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. मधुमेहाशी संबंधित श्रवणदोष स्त्रियांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून आला. मधुमेहाचे निदान झालेल्या व्यक्तींपैकी ४५ ते ५० टक्के जण लठ्ठपणा, हृदयरोग, अतिताण यांसह इतर जीवनशैलीसंबंधित आजारांनी त्रस्त होते.
या अभ्यासात ११,१६६ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. नाशिकमध्ये रुग्णांमध्ये मधुमेहाचा धोका वाढीस लागण्याच्या कारणांमध्ये अधिक हालचाल न करावी लागणारी जीवनशैली, खाण्याच्या आरोग्यास अपायकारक अशा सवयी, चरबीयुक्त आहाराचे आणि तळलेल्या पदार्थाचे मोठय़ा प्रमाणावर केले जाणारे सेवन, व्यायामाचा अभाव या कारणांचा समावेश आहे.
मधुमेहाचे निदान झालेल्यांपैकी ३५ टक्के रुग्ण ते सामोरे जात असलेल्या या स्थितीविषयी अनभिज्ञ होते. त्यांनी हा आजार दुर्लक्षित केला होता, असेही डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे.

Story img Loader