Kawasaki ने भारतात आपली नवी मिडलवेट सुपरस्पोर्ट बाइक 2020 Kawasaki Ninja ZX-6R लाँच केली आहे. ऑक्टोबर 2018 पासूनच कंपनीने या बाइकसाठी नोंदणी सुरू केली होती, त्यामुळे आधीपासूनच ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना फेब्रुवारी महिन्यापासून डिलीव्हरी मिळायला सुरूवात होईल अशी माहिती कंपनीने दिलीये.
कावासाकीच्या या सेगमेंटमधली भारतातील ही एकमेव बाइक आहे. नवी निंजा झेडएक्स-6आर अॅल्युमिनियम फ्रेमवर बनवण्यात आलीये. या बाइकची लांबी 2,025 mm, रुंदी 710 mm आणि उंची 1,100 mm आहे. या सुपरस्पोर्ट बाइकचा व्हिलबेस 1,400 mm आणि सीट हाइट 830 mm आहे. तर वजन 196 किलोग्राम आहे. बाइकमध्ये 17-लीटरची क्षमता असलेली पेट्रोल टाकी आहे. नव्या निंजामध्ये ट्विन एलईडी हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल लाइट देण्यात आली आहे. या शानदार बाइकमध्ये एक अॅनालॉग टेकोमीटरसह डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. अपडेटेड ग्राफिक्समुळे ही बाइक आकर्षक दिसते. या सिंगल सीटर बाइकमध्ये साइड माउंटेड एग्जॉस्ट आहे.
पावर –
नव्या निंजा बाइकमध्ये 636cc, इन-लाइन 4-सिलिंडर, लिक्विड कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 13,500 rpm वर 130 bhp पावर आणि 11,500 rpm वर 70.5 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच देखील या बाइकमध्ये आहे.
फीचर्स –
कावासाकीने नव्या निंजामध्ये भन्नाट लेटेस्ट इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स दिले आहेत. यामध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), दोन पावर मोड्स, एबीएस आणि कावासाकी क्विक शिफ्टर (KQS) असे दमदार फीचर्स आहेत. ही बाइक भारतातच असेंबल करण्यात आली असून केवळ एकाच रंगात उपलब्ध असणार आहे.
किंमत –
10.49 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स शोरूम किंमत ठेवण्यात आली आहे.