सुंदर आणि स्वच्छ नखं केवळ सुंदर दिसत नाहीत तर हातांचे सौंदर्य देखील वाढवतात. अलिकडच्या काळात नखांची देखभाल आणि स्टाईल करण्याचा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. त्यातच आपल्या नखांची योग्य काळजी व निगा न राखल्यामुळे नखे खराब होतात. तसेच अस्वस्थ दिनचर्या, नखांवर बुरशीजन्य संसर्ग, थायरॉईड, फुफ्फुसाचे आजार, मधुमेह किंवा सोरायसिस सारख्या गंभीर समस्या, यामुळे नखांची योग्य वाढ होत नाही. तर कधी कधी नखांची समस्या दूर करण्यासाठी आपण अनेकदा मॅनिक्युअर करतो, पण काही वेळा आपल्याकडे वेळ कमी असतो, त्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊन नखांची ट्रीटमेंट करून घेऊ शकत नाही. त्याकरिता नखांना सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी काही प्रभावी टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही नखं स्वच्छ आणि सुंदर ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

नखांना लिंबाचा रस लावा

अनेकदा घरगुती कामांमुळे नखे पिवळसर होतात, म्हणून नखांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी नखांवर लिंबाचा रस लावा. लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जो नखे खोलवर साफ करतो. तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिक्स करून त्याचा नखांवर लावू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला. आता या पाण्यात १५ मिनिटे हात बुडवून ठेवा. १५ मिनिटांनंतर हात पाण्याने धुवा आणि त्यावर मॉइश्चरायझर लावा. तुमचे नखे पांढरे आणि सुंदर दिसतील.

ऑलिव्ह ऑइल लावा

ऑलिव्ह ऑइल नखांना आतून स्वच्छ व चमकदार ठेवण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म नखं स्वच्छ करण्यास मदत करतात. तुम्हाला एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घेऊन ते थोडसं कोमट करा. या तेलात १५ मिनिटे हातांची नखं बुडवून ठेवा. १५ मिनिटांनी हात तेलातून काढून घ्या आणि कापसाने हात व नखं स्वच्छ करा. ऑलिव्ह ऑइल नखांचा पिवळेपणा दूर करते. त्याचबरोबर हातांचे सौंदर्य देखील वाढवते.

गुलाबपाणी वापरा

ब्युटि प्रोडक्टमध्ये गुलाबपाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. गुलाबपाणी केवळ त्वचा उजळत नाही तर नखांना सुंदर व चमकदार ठेवण्यास मदत करते. अँटीसेप्टिक, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, गुलाब पाणी नखांवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. गुलाबपाणी वापरण्यापूर्वी, हात पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर नखांवर गुलाब पाणी वापरा.