How To Reduce Sugar Intake: साखर हा घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. पण अन्नावाटे शरीरात जाणाऱ्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात असणे आवश्यक असते. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढल्यास वजन वाढणे, स्थूलता, मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता असते. शर्करायुक्त पदार्थांच्या सेवनामुळे अनेक आजार संभवतात. यामध्ये शारीरिक आजारांसह मानसिक आजारांचाही समावेश होतो. जास्त शुगर इनटेकमुळे त्वचेशी संबंधित रोग होण्याची शक्यता असते. ही गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी शुगर इनटेक म्हणजेच साखरेच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे आवश्यक असते.
Sugar Intake कमी करण्यासाठीचे उपाय:
फूड लेबल वाचा.
प्रत्येक पदार्थांच्या कव्हरवर तो पदार्थ तयार करताना कोणत्या गोष्टींचा वापर केला आहे, त्यामध्ये कोणते घटक आहे याची माहिती दिलेली असते. याला फूड लेबल असे म्हटले जाते. फूड लेबल वाचून त्या पदार्थामध्ये किती प्रमाणात साखर आहे हे जाणून घेता येते. यानुसार जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळता येते.
ताज्या फळ-भाज्या खाण्यावर भर द्या.
फळे, भाज्या या सेंद्रिय (Organic) पदार्थांमध्ये असलेली नैसर्गिक स्वरुपातील साखर शरीरामध्ये सहज पचते. जंक फूड खाल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. या पदार्थांऐवजी ताजी फळे, भाज्या, कडधान्ये खाल्याने शुगर इनटेक कमी करणे शक्य होते. साखरेला पर्याय म्हणून मध, गूळ अशा पर्यायांचा वापर करावा.
प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन करु नका.
सोडा, एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स यांच्यामध्ये असलेली साखर पचायला जड असते. यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. याऐवजी दूध, ग्रीन टी या पेयांचे सेवन करणे आरोग्यदायी ठरते. कोल्ड ड्रिंक्सप्रमाणे प्रोसेस्ड फूडमध्ये मोडणारे पदार्थ खाल्याने शरीराला साखर वाढते. शिवाय शरीराला इतर अपाय देखील होतात.
आहारासंबंधित आराखडा तयार करा.
आपण दिवसभरात काय खातो आणि काय खायला हवे याबाबतची संपूर्ण माहिती मिळवून एक आराखडा तयार करावा. या आराखड्यानुसार जेवणाच्या वेळा ठरवून त्या पाळाव्यात. नैसर्गिक आणि शरीरासाठी लाभदायक पदार्थांचे सेवन करावे. असे केल्याने साखरेची पातळी नेहमी नियंत्रणात राहील. शुगर इनटेकसह कॅलरी इनटेकबाबतची माहितीदेखील सहज मिळवता येईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)