आपला बांधा सुडौल आणि आकर्षक असावा असे बहुतांश महिलांना वाटते. मात्र घरातल्या गोष्टी, नोकरी आणि इतर बाबतीत अडकून गेल्याने महिलांचे स्वत:कडे दुर्लक्ष होते. सकाळच्या कामांच्या गडबडीत व्यायाम मागे पडतो. मग शरीरावर विनाकारण वाढणाऱ्या चरबीमुळे आपण बेढब दिसू लागतो. या परिस्थितीतून स्वत:ची सुटका करुन घ्यायची असेल आणि आपला बांधा सुडौल दिसावा असे वाटत असेल तर निश्चितच काहीतरी प्रयत्न करण्यावाचून पर्याय नसतात. कमीत कमी वेळात आणि उपकरणांशिवाय सहज करता येतील असे व्य़ायामप्रकार केल्यास बांधा सुडौल होण्यास निश्चितच मदत होते. तेव्हा पाहूयात असेच काही सोपे आणि सहज करता येण्याजोगे व्यायामप्रकार…
दोरीच्या उड्या – दोरीच्या उड्या मारणे हा अतिशय उत्तम व्यायमप्रकार आहे असे लहान मुलांना सांगण्यात येते. मात्र हा व्यायामप्रकार केवळ लहान मुलांसाठीच नाही तर सर्वच वयोगटातील लोकांसाठी उत्तम व्यायाम आहे. महिलांनी हा व्यायाम केल्यास त्यांना बांधा योग्य त्या आकारात आणण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो.
जागेवर उभे राहून जॉगिंग – जॉगिंग हाही उत्तम व्यायामप्रकार आहे. मैदानावर किंवा बागेत जाऊन व्यायाम आणि त्यातही जॉगिंग करणारे आपल्याला अनेक जण दिसतात. पण महिलांना घाईत व्यायामाला बाहेर पडता येत नाही. अशा महिलांनी जागेवर उभे राहून जॉगिंग केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. रोज कीमान १० मिनिटांसाठी जॉगिंग करा. ही वेळ तुम्ही हळूहळू वाढवत नेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराची ताकद वाढण्यास मदत होते.
स्क्वाट्स – कंबरेच्या खालचा भाग योग्य त्या आकारात येण्यासाठी स्क्वाट्स मारण्याचा फायदा होतो. स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. तसेच यामध्ये शरीराला ताण पडल्याने शरीरावरील अनावश्यक चरबी घटण्यासही मदत होते.
पुश-अप – पुशअप मारल्यामुळे संपूर्ण शरीराला ताण पडतो. शरीरातील वरच्या भागाचे स्नायू बळकट होण्यासाठी पुश-अप अतिशय उपयुक्त ठरतात. सुरुवातीला तुम्ही १० ते १५ पुश-अप मारत असाल तर हळूहळू याची संख्या आणि वेग थोडाथोडा वाढवत न्या.
प्लॅकस – प्लॅकस करणे वाटते तितके सोपे नसते. मात्र सवयीने हे नक्की जमू शकते. सुरुवातीला केवळ १० सेकंद टिकवून ठेवावे. नंतर हा कालावधी ३०, ४५ ते ६० सेकंदांपर्यंत वाढवावा. प्लॅंकमुळे डोक्यापासून टाचेपर्यंत सर्व अवयवांचा व्यायाम होतो. प्लॅंक नियमित केल्यास पाठीची आणि मणक्याची दुखणी दूर होण्यास मदत होते.