दिवाळीत साफसफाई करण्यात कसा वेळ जातो हे समजतच नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिला घरातील साफसफाई करण्यात व्यग्र असतात. त्यात घरातील जुन्या वस्तू फेकून देण्यापासून किचनमधील सर्व भांडी चकाचक करण्यापर्यंतच्या कामांचा समावेश असतो. पण, या साफसफाईत आपली तब्येत बिघडते. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही झटपट साफसफाई करू शकता.
काचेच्या वस्तू स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स
कॉफी टेबल, आरसे, खिडक्या-दरवाजांच्या काचा, काचेचे ग्लास या सर्व काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करा. कारण- त्यामुळे धूळ आणि हट्टी डाग अगदी सहजपणे काढून टाकता येतात. त्यासाठी तुम्ही व्हिनेगर पाण्यात समान प्रमाणात मिसळा. त्यानंतर एका स्प्रे बाटलीत ते पाणी भरून अस्वच्छ वस्तूंवर स्प्रे करा. नंतर ते दोन ते तीन मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर मायक्रोफायबर कापड किंवा सुती कापडाने सर्व काचेच्या वस्तू पुसून स्वच्छ करा.
अशा प्रकारे पंखा करा साफ
पंख्याच्या ब्लेडवर अडकलेला कचरा वा धूळ झाडूने काढताना तो घरभर पसरतो आणि आजूबाजूच्या सर्व वस्तू अस्वच्छ होतात. अशा वेळी एका जुन्या कपड्याच्या मदतीने तुम्ही पंख्याची ब्लेड्स स्वच्छ करा. त्यासाठी कपडा साफ करावयाच्या पंख्याच्या ब्लेडवर ठेवा आणि मग तो कपडा त्या ब्लेडवरील धुळीसोबत तुमच्या दिशेने खेचा.
पाण्याचे डाग स्वच्छ करण्याचे उपाय
अनेकदा पाण्यामुळे घरातील फरशी, प्लास्टिकच्या बादल्या व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवर पांढरा थर साचतो. अशा वेळी ते डाग नॉर्मल डिटर्जंटने काढणे फार कठीण असते. अशा परिस्थितीत हे डाग काढण्यासाठी अॅपल व्हिनेगर स्प्रे करा आणि १५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुऊन स्वच्छ करा.
टाइल्स स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स
टाइल्सची चमक हळूहळू कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही केमिकल क्लीनरऐवजी बेकिंग सोडा वापरून टाइल्स पुन्हा चमकवू शकता. त्यासाठी पाणी आणि व्हिनेगरची पेस्ट तयार करून, टाइल्स ज्या ठिकाणी मळकट दिसत आहेत, तिथे १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.
काही मिनिटांत बाथरूम करा स्वच्छ
कमी वेळेत घरातील बाथरूम स्वच्छ करण्यासाठी आधी ते पूर्णपणे रिकामे करा. त्यानंतर व्हिनेगर, पाणी व डिश लिक्विड यांचे मिश्रण करून ते स्प्रे करा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर स्क्रबने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे टाइल्सवरील डाग आणि दुर्गंधी लगेचच दूर होईल.