घरात बिनधास्तपणे वावरणाऱ्या झुरळांमुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. कधी चहाच्या कपात तर कधी किचनच्या ओट्यावर ही झुरळं फिरताना दिसतात. सर्व प्रकारच्या घाणीतून येत बाहेर फिरणारी ही झुरळ घरातही घाण पसरवतात, यामुळे आजारपणही येते. झुरळांचा घरात प्रवेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बाथरुम आणि किचन सिंक. ही ठिकाणं सील करण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने झुरळांना घरात प्रवेश करण्यापासून रोखणे अवघड होते. अशाप्रकारे झुरळांच्या समस्येपासून तुम्ही देखील हैराण झाला असाल तर तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहे.
पण त्याआधी घरात अस्वच्छता, ओलसरपणा, खरकटा किंवा इथे- तिथे अन्न विखुरले तर तुम्ही स्वत:च झुरळांना आमंत्रण देत आहात एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला घरातून झुरळांचा कायमचा नायनाट करायचा असेल तर घराची नियमित साफसफाई करा.
‘या’ घरगुती टिप्सनी तुम्ही झुरळांचा करा नायनाट
१) बेकिंग सोडा
झुरळांचा घरास सुळसुळाट होऊ नये म्हणून बेकिंग सोड्यात साखर मिसळा आणि हे मिश्रण ड्रेनेजसह जिथे झुरळांची संख्या जास्त असते तिथे शिंपडा. हे मिश्रण खाल्ल्यानंतर झुरळे लगेच मरतात .
२) कडुलिंब
किड – किटकांना मारण्यासाी कडुलिंब हा एक अतिशय प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. जर तुमच्या घरात झुरळांचे प्रमाण वाढले असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल किंवा पावडर वापरू शकता. यासाठी हे मिश्रण तुम्हाला घरात जिथून झुरळ बाहेर पडतात त्या ठिकाणी शिंपडावे लागेल.
३) फॅब्रिक सॉफ्टनर
तुमच्या बाथरूममध्ये फॅब्रिक सॉफ्टनर असल्यास झुरळांचा कायमचा नायनाट करणे खूप सोपे जाईल. तुम्हाला फक्त ते पाण्यात मिसळावे लागेल आणि जिथे झुरळं फिरताना दिसतात तिथे स्प्रे करा. असे केल्याने झुरळं लगेच मरतात. तुम्ही हे मिश्रण ड्रेनेजवर स्प्रे करु शकता.
४) बोरिक ऍसिड
बोरिक अॅसिड हा झुरळ नष्ट करण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी ते नाल्यात आणि झुरळांच्या इतर ठिकाणी शिंपडा. झुरळ याच्या संपर्कात येताच काही सेकंदात मरतात. पण हे वापरताना खूप काळजी घ्या. कारण ही पावडर विषारी असते. त्यामुळे लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा.