पावासाळा सुरू होताच घरात अनेक प्रकारचे कीटक, माश्या दिसू लागतात; ज्या स्वयंपाकघरात शिरून भाज्या, भांडी, खाद्यपदार्थांवर जाऊन बसतात. किती हुसकावले, फिनेलने फरशी स्वच्छ पुसली तरी हे कीटक आणि माश्या घराबाहेर जायचे नाव घेत नाहीत. केवळ घरातच नाही, तर घराबाहेरही कीटक, डास, माश्यांचा हैदोस पाहायला मिळतो. त्यातील काही कीटकांमुळे कोणतीही हानी होत नाही; पण काही कीटक अत्यंत विषारी असतात. त्यामुळे त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे किंवा सूज येणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.
अशा परिस्थितीत घराला डास, माश्या व किटकांपासून शक्य तितके सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. एकही कीटक तुमच्या घरातच काय घराभोवतीही फिरू नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे करणे महाग तर नाहीत; पण करायलाही ते अगदी सोपे आहेत. मग चला जाणून घेऊ ते उपाय…
पावसाळ्यात डास, माश्या, कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी घरगुती उपाय
१) लिंबू – बेकिंग सोडा
कीटकांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वांत स्वस्त उपाय म्हणजे लिंबू आणि बेकिंग सोडा. त्यासाठी एका छोट्या बाटलीत पाणी घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस व बेकिंग सोडा टाका आणि चांगलं मिसळून घ्या. त्यानंतर घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ते पाणी स्प्रे करा. किचन, बाथरूम व टॉयलेट यांसारख्या ठिकाणी कीटक अधिक असण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे अधिक फवारणी करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
२) कडुलिंबाचे तेल
कडुलिंबाचे तेल कीटकनाशक म्हणून वापरले जाते. त्यामुळे कीटक दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलात थोडे पाणी मिसळून ते स्प्रे करण्याच्या बाटलीत भरा. हे द्रावण घराच्या बाहेर आणि आत स्प्रे करा. त्यामुळे तुमचे घर स्वच्छ राहील आणि किडे अजिबात आत येणार नाहीत.
३) काळी मिरी
काळी मिरी ढेकूण, झुरळ, कीटकांची शत्रू मानली जाते. त्यामुळे ते बारीक करून पाण्यात मिसळा. आता स्प्रे बाटलीच्या मदतीने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात नीट फवारणी करा. कीटकांना मिरचीचा तीव्र वास आवडत नाही म्हणून ते त्यापासून दूर पळतात. ही स्वस्त आणि सोपी पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
४) ब्लॅक फिल्म
कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी ब्लॅक फिल्मदेखील खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही दारे आणि खिडक्यांवर ब्लॅक फिल्म चिकटवा. ही एक पातळ शीट आहे; जी रात्री घरातील प्रकाश बाहेर जाण्यापासून प्रतिबंधित करते. आणि कीटक प्रकाश पाहिल्यानंतरच घरात येतात. अशा परिस्थितीत ब्लॅक फिल्म लावल्याने त्यांना प्रकाश दिसू न शकल्यामुळे कीटकांना घरात येण्यापासून रोखले जाईल.
५) पेपरमिंट आणि लॅव्हेंडर
घराला सुंदर येण्यासाठी, तसेच कीटकांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही पेपरमिंट आणि लॅव्हेंडर एसेन्शयल ऑइलचा वापर करू शकता. कीटकांना पळवून लावण्यासाठी हे फायदेशीर आहे, तुम्हाला ते फक्त कीटक ज्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी स्प्रे करावे लागेल. अशाने कीटक, माश्या, डास घरातच काय घराभोवतीही फिरकणार नाहीत.