हिवाळा सुरू होताच अनेकांना हिल स्टेशनवर जाऊन थंड बर्फात फिरायला जाण्याची इच्छा होते. भारतात बर्फवृष्टी पाहण्यासाठी डिसेंबर आणि जानेवारी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. कापसासारख्या पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र बर्फात फिरण्याची वेगळी मजा असते. उत्तराखंड, जम्मू काश्मीरपासून ईशान्येपर्यंत अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे दरवर्षी हिवाळ्यात बर्फवृष्टी पाहायला मिळते. त्यात डिसेंबर महिना यायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही भेट देण्याचा विचार करू शकता.
गुलमर्ग
बर्फवृष्टीबरोबर तुम्हाला स्किइंगची आवड असेल, तर तुमच्यासाठी गुलमर्गपेक्षा चांगली जागा नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील एक पर्यटनस्थळ आहे; जे त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते.
लेह
डिसेंबर महिन्यात पर्यटनासाठी लेह हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला अतिशय स्वस्त फ्लाइट तिकिटंदेखील मिळतात. हिवाळ्यात येथे गर्दी कमी असते आणि हॉटेल्समध्येही मोठ्या प्रमाणात सूट मिळते. डिसेंबर महिन्यात येथे जोरदार बर्फवृष्टी होते.
कनाटल
तुम्ही चंबा-दिल्ली- डेहराडून- धनौल्टी मार्गे कनाटलला पोहोचू शकता किंवा दिल्ली- ऋषिकेश-चंबामार्गे कनाटलला पोहोचू शकता. या ठिकाण खूप बर्फवृष्टी होते. कधी कधी बर्फवृष्टी इतकी होते की रस्ता बर्फाने भरून जातो. अशा परिस्थितीत भटकंती किंवा ट्रेकिंग टाळा. तुम्ही हॉटेलच्या आसपास बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.
औली
स्किइंग स्लोप किंवा बर्फातील खेळांचा आनंद घेण्यासाठी औली हे उत्तराखंडमधील सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे हिमवर्षाव खूप सामान्य आहे. या ठिकाणी तुम्ही आशियातील सर्वांत लांब केबल कार आणि स्किइंगचा आनंद घेऊ शकता. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी औली हे हनिमूनसाठी उत्तम ठिकाण आहे.
खज्जियार
हिवाळ्यात खज्जियार हा गवताळ प्रदेश बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेला असतो. हिमवर्षाव पाहणाऱ्यांसाठी हे दृश्य खूपच आल्हाहदायक असते. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे याला भारताचे स्वित्झर्लंड असेही म्हणतात. पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांचाही आनंद तुम्ही याठिकाणी घेऊ शकता.
मॅक्लिओडगंज
जर तुम्हाला हिमवर्षाव पाहायचा असेल तर उबदार कपडे बॅगेत भरून मॅक्लिओडगंजला जा. मॅक्लिओडगंज हे हिमालय प्रदेशातील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे सर्वांत जास्त बर्फवृष्टी होते. बर्फाच्छादित शिखरे, पॅराग्लायडिंग आणि नड्डी व्ह्यू पॉइंट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.