तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवण्यासाठी विशीतले वय सर्वोत्तम होय. या काळात अशा गुंतवणुकी करा ज्या तुम्हाला पुढे चांगला परतावा देतील किंवा कमी प्रीमियमवर आरोग्य विमा पॉलिसी घ्या. म्हणूनच विशीत घेतलेले आर्थिक निर्णय तुमच्या क्रेडिट स्कोअरबरोबरच तुमच्या संपूर्ण वैयक्तिक अर्थकारणासाठी महत्वाचे असतात. चांगला क्रेडिट स्कोअर असल्याने तुम्हाला कर्ज किंवा इतर आर्थिक व्यवहार करणे सोपे जाते, तसेच स्कोअर कमी असल्यावर तुमचे कर्जाचे पर्याय कमी होतात. तेव्हा या वयोगटातील लोकांनी क्रेडिट स्कोअरवर प्रभाव पाडणाऱ्या चुकांपासून सावध राहिले पाहिजे आणि आपला क्रेडिट स्कोअर सुदृढ ठेवला पाहिजे.
शून्य कर्ज म्हणजे चांगला क्रेडिट स्कोअर
कमावत्या तरुणांमध्ये एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे कुठल्याही प्रकारचे कर्ज किंवा देणी नसल्याने क्रेडिट स्कोअर चांगला होतो. या गैरसमजामुळे ते रोख खरेदी करतात आणि क्रेडिट कार्डांपासून लांब राहातात. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर कर्जाची परतफेड करण्यावर अवलंबून असल्यामुळे क्रेडिट हिस्ट्री म्हणजेच कुठलेही कर्ज नसल्याने वित्तीय संस्थांसाठी परतफेडीच्या क्षमतेचा अंदाज लावणे कठीण होते.
अनेक क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करणे
कर्ज मुळीच नसल्याने जसा क्रेडिट स्कोअर सुधारत नाही, तसेच अनेक क्रेडिट कार्डांसाठी अर्ज केल्याने सुद्धा विपरीत परिणाम होतो. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता, तेव्हा कंपनी कडून सिबिलकडे तुमच्या क्रेडिट इतिहासाची विचारणा केली जाते. जेव्हा सिबिलला कळते की थोड्याच कालावधीत अशा अनेक विनंत्या केल्या गेल्या आहेत, तेव्हा सिबिलकडून तुमच्यावर अशा व्यक्तीचे लेबल लावले जाते जिची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता कमी आहे आणि म्हणून तिला अधिक उधारीची गरज आहे. म्हणून, क्रेडिट कार्ड कंपनींच्या आकर्षक ऑफर्सच्या आहारी जाऊ नका आणि अनेक क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करू नका.
देणे पूर्ण केल्यानंतर क्रेडिट कार्ड बंद करणे
तरुण लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन अशा मोठ्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरतात आणि एकदा त्यावरील देणे पूर्ण झाल्यानंतर ते ती कार्डे बंद करून टाकतात. अशाने त्यांच्या क्रेडिट इतिहासावर विपरीत परिणाम होतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरमागे बहुधा दीर्घ मुदतीचा क्रेडिट इतिहास असतो. कार्ड बंद केल्याने हा रेकॉर्ड संपुष्टात येतो आणि कर्ज पूर्ण केल्यावर आणि नियमित परतफेड केल्यावर सुद्धा सरासरी क्रेडिट स्कोअर कमीच होतो. म्हणूनच, देणे संपवल्यानंतर सुद्धा क्रेडिट कार्ड बंद करू नका.
इतरांच्या कर्जासाठी जामीन राहणे
तरुणपणी बहुधा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले जातात. मित्र किंवा नातेवाइकांच्या कर्जासाठी जामीन राहणे असाच एक निर्णय आहे. जेव्हा तुम्ही कर्जासाठी जामीन राहता, तेव्हा जर त्यांनी परतफेड केली नाही तर ती जबाबदारी तुमची होते. अशावेळी तुम्ही ते कर्ज फेडू शकला नाहीत, तर तुमचा क्रेडिट स्कोअर निश्चितच कमी होईल.
क्रेडिट कार्डाचा सर्रास वापर
तुमच्या उमेदीच्या काळाच्या सुरूवातीला, जेव्हा तुमच्या स्वतंत्र आयुष्याची सुरूवात असते, तेव्हा तुमचे खर्च अधिक असण्याचा संभव असतो. तुमची खरेदी बहुधा तुमच्या क्रेडिट कार्डाच्या मर्यादेवर अवलंबून असते आणि तुम्हाला परतफेडीच्या तारखेचा विसर पडतो. जर तुम्ही परतफेड केली नाहीत, तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. पण जरी तुम्ही वेळेवर परतफेड केलीत, तरी असे दिसून येण्याची शक्यता असतेच की तुमची जीवन-शैली क्रेडिट कार्डावर अवलंबून आहे आणि त्यामुळे सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर खालावतो. यासाठी तुम्ही अवास्तव खर्चांवर आळा घालावा आणि आपल्या गरजांप्रमाणेच खर्च करावा.
उशीरा परतफेड करणे
ईएमआय किंवा क्रेडिट कार्डाची उशीरा परतफेड केल्याने तुम्हाला व्याजासकट दंड तर भरावा लागतोच, त्याबरोबरच तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा कमी होतो. विशीतल्या तरुणांसाठी आयुष्याचा आनंद लुटणे तर गरजेचे आहेच, त्याचसोबत असे भक्कम आर्थिक निर्णय घेणेसुद्धा गरजेचे आहे ज्याने त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होईल.
आदिल शेट्टी,
सीईओ, बँकबझार