Swelling on Face In Morning: केव्हा तरी सकाळी उठल्यावर मस्तपैकी ‘I Woke Up Like This’ अशी स्टोरी टाकावी अशी तुमची पण इच्छा होते का? कामाच्या दिवशी अर्थात सकाळची धावपळ असल्याने हे शक्य होत नाही पण सुट्टीच्या दिवशी निवांत झोपून उठल्यावर एकदा तरी असा छान सेलिब्रिटी लुकमध्ये फोटो टाकावा असं वाटू शकतं. पण नेमकं त्याच वेळी चेहरा सुजलेला असेल तर आपली इच्छा काही पूर्ण होतच नाही. सकाळी उठल्यावर चेहरा सुजल्यासारखा दिसणं हा त्रास अनेकांना छळतो पण त्यामागील नेमकं कारण काही केल्या समजत नाही. झोपेतून उठल्यावर काही वेळ तरी ही सूज कायम राहते आणि नंतर आपोआपच कमी होत जाते त्यामुळे उपाय काय करावा हा प्रश्नही सुटत नाही. आज आपण या समस्येच्या मूळाशी जाणार आहोत. चला तर मग, झोपेतून उठताच चेहऱ्यावर येणाऱ्या सुजेमागील कारण समजून घेऊया..
झोपेतून उठताच चेहऱ्यावर सूज का दिसते?
1) रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे किंवा स्नॅक्स खाणे
उद्या सुट्टी आहे आज रात्री मस्तपैकी एखादा सिनेमा बघू, जेवण कमीच करू आणि रात्री पॉपकॉर्न, चिप्स खाऊ. मज्जा येईल! असे प्लॅन आपणही करत असाल तर तुम्हाला आधी हे लक्षात घ्यायला हवं की हा मोह तुमच्या चेहऱ्यासाठी उद्या त्रासदायक ठरू शकतो. रात्रीच्या वेळी उशिरा जागं राहिल्यामुळे आणि त्यातही खारट पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीरात द्रव वाढून उर्वरित मीठ त्वचेच्या पेशींमध्ये शिरू शकते. यामुळे चेहरा सकाळी फुग्याप्रमाणे फुगलेला दिसू शकतो. अगदीच एखाद्या रात्री तुमचा मूव्हीचा प्लॅन असेलच तर निदान खाण्याच्याबाबत तरी कमी खारट पर्याय निवडा.
२) तुमच्या आहारात जास्त मीठाचे सेसावं
तुमच्या आहारात सातत्याने मीठ जास्त असल्यास, तुमच्या चेहऱ्यासह तुमच्या शरीरात जास्त पाणी साठते. प्रक्रिया केलेले स्नॅक्स, कॅनमध्ये पॅक केलेलं सूप आणि फास्ट फूड यांसारखे पदार्थ सोडियमचे गुप्त स्रोत असतात. तुमच्या मिठाच्या सेवनावर लक्ष ठेवल्यास सकाळी चेहऱ्याला सूज येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते.
3) झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ
झोपण्यापूर्वी छान गरम पाण्याने आंघोळ केल्यावर दिवसभरातील थकवा दूर होऊ शकतो असं म्हणतात पण यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या विस्तारू शकतात आणि यामुळे तुम्ही उठता तेव्हा तुमचा चेहरा अधिक फुगीर दिसू शकतो. त्याऐवजी कोमट शॉवर घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला थकवा तर घालवता येईलच पण त्वचेवर सुद्धा याचा सौम्य प्रभाव असेल.
4) मद्यपान आणि डिहायड्रेशन
एक ग्लास वाईन, एक ग्लास कॉकटेल यामुळे डिहायड्रेशन (निर्जलीकरण) वाढू शकते याचे कारण म्हणजे तुम्ही जेव्हा मद्यपान करता तेव्हा शरीराचा लघवी तयार करण्याचा वेग वाढू शकतो. परिणामी अधिकाधिक द्रव शरीराबाहेर टाकले जाते. जेव्हा ही प्रक्रिया चालू असते तेव्हा शरीर सुद्धा पाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते यामुळेच सकाळच्या वेळी चेहऱ्यावर सूज जाणवते. यावर उपाय म्हणजे एकतर मद्यपान टाळा किंवा मद्यपान करताना त्यातील पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या.
5) झोपण्याची स्थिती महत्त्वाची
विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण तुमची झोपण्याची वेळच नव्हे तर झोपण्याची स्थिती सुद्धा अनेक गोष्टींवर परिणाम करत असते. जर तुम्ही तुमच्या पोटावर किंवा कुशीवर झोपत असाल, तर तुमचा चेहरा उशीवर दाबला जाऊ शकतो, ज्यामुळे द्रव जमा होतो आणि सूज येते. हा प्रभाव कमी करण्यासाठी तुमच्या पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
6) ऍलर्जी आणि सायनस
कधीकधी, चेहऱ्याला सूज येण्यामध्ये पूर्णपणे तुमचाच दोष नसू शकतो. ऍलर्जी किंवा सायनसमुळे तुमच्या अनुनासिक परिच्छेदामध्ये आणि तुमच्या डोळ्याभोवती रक्तसंचय आणि जळजळ होऊ शकते, ज्यामुळे सूज येऊ शकते. यावर उपाय म्हणून तुम्ही हायपोअलर्जेनिक बेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा तुमच्या बेडरूममध्ये एअर प्युरिफायर वापरण्याचा विचार करा.
हे ही वाचा<< मुकेश अंबानी यांचा डाएट प्लॅन नीता अंबानींनी केला शेअर; पार्टी, मेजवान्यांमध्येही कठोरपणे पाळतात ‘हा’ नियम
जर सकाळी चेहऱ्यावर येणारी सूज खूप जास्त असेल आणि बराच वेळ टिकून राहत असेल तर आपण याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यामागे जर कोणती अन्य आरोग्य स्थिती कारण असेल तर आपण त्या समस्येचे निराकरण करण्यावर लक्ष द्यायला हवे. जर हा त्रास कमी वेळासाठी होत असेल तर मात्र जीवनशैलीतील काही बदल सुद्धा आपल्याला हवा तसा प्रभाव देऊ शकतात.