जवळपास दीड वर्षाचा अखंड काळ आपल्यापैकी बहुतांश जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे, आपलं काम आणि राहणं असं दोन्ही एकाच ठिकाणापुरतं म्हणजेच आपल्या घरापुरतं मर्यादित झालं. येणारा प्रत्येक नवा दिवस एकाच ठिकाणी आणि एकाच वातावरणात काढणं हे निश्चितच मोठं आव्हानात्मक आहे. यामुळे, आपल्यापैकी अनेकांना निश्चितच दररोज या किंचितही न बदलणाऱ्या वातावरणाचा कंटाळा आला असेल. तुम्हालाही हे दररोज जाणवत असेल. पण ह्यावर नेमका उपाय काय?
आपल्या घरातील जर कोणता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग असेल तर आहे घराच्या भिंती. आता घरातील याच सर्वात महत्त्वाच्या ठरणाऱ्या भागावर अगदी लहानसे बदल करून आपण आपल्या घराचं रूप अक्षरशः पूर्णपणे पालटवू शकतो. विशेष हे करणं फारसं खर्चिक नाही. फक्त थोडीशी कल्पकता आणि वेळ पुरेसा आहे. तर आपल्या घरातील भितींना नवं, मोहक आणि आकर्षक रूप देण्यासाठी काही साध्या-सोप्या टिप्स लगेच जाणून घेऊया
१) पेंटिंग्स आणि फोटोज
भिंतींवर एखादं उत्तम पेंटिंग्स किंवा फोटोज हे नेहमीच घरासाठी सुपर मूड लिफ्टर ठरत असतात. अगदी लहानश्या आकाराचं पण आकर्षक आणि सकारात्मक ऊर्जा देणारं कोणतंही पेंटिंग तुमच्या घराच्या भिंतींची शोभा कैक पटींनी वाढवू शकतं.
२) मूड-लिफ्टिंग मिरर
आकर्षक आकारांचे, विविध प्रकारचे आरसे हे नेहमीच आपल्या घरावर एक वेगळी छाप उमटवत असतात. मुख्य म्हणजे ते प्रकाशाला परावर्तित करण्यास मदत करतात आणि एखाद्या लहानशा जागेला देखील मोठ्या आणि प्रकाशमान जागेचा अनुभव देतात. त्यामुळे, तुम्ही भिंतीवर लावण्यासाठी असेच काही लहान, मोठ्या आकारचे, सुंदर आणि युनिक डिझाइन्सचे आरसे वापरू शकतात
३) आकर्षक फॅब्रिक्स
असं मानतात की, तुमच्या घरातील भिंतीवर कोणत्या प्रकारचं फॅब्रिक आहे यावरून घरातील माणसांचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं. यासाठी टेपेस्ट्री (Tapestry) हा एक उत्तम पर्याय आहे. टेपेस्ट्री म्हणजे विशिष्ट फॅब्रिकवरचं डिझाईन. याचसोबत प्रकाशमान घरासाठी अन्य काही पॅटर्न्स आणि विविध आकर्षक रंगांचा पर्याय देखील तुमच्यासाठी खुला आहे.
४) व्हिंटेज अॅक्सेंट
व्हिंटेज लूक हा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळे, घराच्या भिंतींसाठी देखील हा लूक निश्चितच उत्तम दिसेल. व्हिंटेज लूक तुमच्या घराला एक नवीन अनुभव आणि चांगली उर्जा देतात. काही अँटिक वस्तू, जुन्या पद्धतीचं आकर्षक फर्निचर, कपाटं, आणि स्टेटमेंट फोटो फ्रेम्स हा यासाठीचा उत्तम पर्याय आहे.
५) आकर्षक प्रकाशयोजना
घरातील लायटिंग अर्थात प्रकाशयोजना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचसोबत, आपल्या कल्पकतेने आणि विशिष्ट प्रकारे केलेलं लायटिंग हे आपल्या घराचा मूड अगदी क्षणार्धात खूप सकारात्मक, आकर्षक करू शकतो. हे लायटिंग तुमच्या घराला एकतर अगदी शांत आणि आरामदायी किंवा प्रचंड ऊर्जा देणारं असं दोन्ही स्वरूपाचं ठरू शकतं. ते पूर्णपणे तुमच्या आवडी-निवडीवर अवलंबून आहे. आपल्या भिंतीसाठी हँगिंग वॉल लाईट्सचा वापर करा.
६) वॉल आर्ट्स
वॉल आर्ट्स हा नेहमीच एक अत्यंत उत्तम आणि सोपा पर्याय आहे. या वॉल आर्ट्स तुम्ही खरेदी करू शकता किंवा स्वतः करू शकता. शक्यतो अशा वॉल आर्ट्सचा पर्याय निवड ज्या सहज काढता येण्याजोग्या असतील आणि घराला आरामदायी लूक देतील. सहज काढता येण्याजोग्या वॉल आर्ट्समुळे आपल्या भिंतींचा नुकसान होत नाही आणि आपण पुढे विविध पर्याय निवडू शकतो.