जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे व दुर्लक्ष केल्याने दहापकी सात मधुमेही रुग्णांचा आजार नियंत्रणाबाहेर जात असल्याचे देशभरातील आठ प्रमुख शहरांत केलेल्या पाहणीत दिसून आले. भारतीयांच्या भात आणि चपाती खाण्याच्या सवयीचा त्यात प्रामुख्याने वाटा आहे. पाहणी केलेल्या चार हजारहून अधिक मधुमेही रुग्णांपकी १७ टक्के व्यक्तींना वयाच्या ३५व्या वर्षांपूर्वी मधुमेहाचे निदान झाल्याचे धक्कादायक वास्तवही या पाहणीतून समोर आले.
मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, थिरुवनंतपूरम, लखनौ, दिल्ली आणि कोलकाता अशा आठ शहरांमधील ४१०० मधुमेही रुग्णांचा आहार, सवयी, रक्तातील साखरेचे प्रमाण तसेच मधुमेह व्यवस्थापनाविषयी माहिती घेण्यात आली. या पाहणीत ६२ टक्के जण स्थूल आढळले. त्यातही स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक स्थूल आढळल्या. यातील ५५ टक्के व्यक्तींना वयाच्या ४५ व्या वर्षांपूर्वी तर १७ टक्के व्यक्तींना वयाच्या ३५व्या वर्षांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले होते. मुख्य म्हणजे ६५ टक्के जणांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे. मुंबईत हे प्रमाण ५६ टक्के, तर चेन्नईत सर्वाधिक ८७ टक्के होते. शहरातील सर्वात कमी प्रमाण दिल्लीत (४७ टक्के) असले तरी तेदेखील खूप जास्त असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यासाठी व्यक्तींचा आहार कारणीभूत असल्याचे दिसून आले. भात आणि पोळी यांचे प्रमाण जास्त असल्याने सर्व सहभागी मधुमेहींच्या जेवणामध्ये सरासरी ६८ टक्के कबरेदके होती. त्यातही दक्षिणेकडील शहरांमध्ये भाताचे प्रमाण जास्त असल्याने तेथील परिस्थिती गंभीर आहे. भातासारख्या पटकन पचणाऱ्या कबरेदकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने कमी-जास्त होते. पाहणीत सहभागी झालेल्यांपकी ८० टक्के लोक रोज तीन ते चार वेळा जेवतात व त्यात साडेचार ते सात तासांचा कालावधी असतो. सकाळची न्याहरीही उठल्यावर तब्बल साडेतीन तासांनी घेतली जाते. त्यातही भारतीयांमध्ये उपवास आणि मेजवानी यांचे प्रमाण आढळत असल्याने यामुळे ग्लुकोजच्या पातळीत चढ-उतार व बदल होतात, असे लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी नमूद केले.
आहारासोबतच व्यायामाबाबतही सहभागकत्रे फारसे उत्साही नव्हते. चालण्याचा व्यायाम करीत असल्याचे ९३ टक्के जणांनी सांगितले. ४० टक्के जण इतर व्यायाम प्रकार करीत होते. मधुमेह हा आजार इतर आजारांनाही सोबत आणतो. ४० टक्के मधुमेही रुग्णांना रक्तदाबाचा विकार होता, तर ७० टक्के व्यक्तींना डोळ्यांचे, मज्जासंस्थेचे विकार आदी आजार होते.

Story img Loader