काहीतरी नवं करायचं असेल, आपल्यात दांडगी इच्छाशक्ती आणि ऊर्जा असेल तर वय हे कधीच बंधन ठरत नसतं. वेळोवेळी हे सिद्ध झालं आहे. आता जगासमोर याचंच आणखी एक उदाहरण ठेवलंय ९९ वर्षीय मॉडेल आजीने. होय, मॉडेल आजी! कॅलिफोर्नियास्थित हेलेन सायमन यांनी अलीकडेच ‘सेई ब्यूटी’साठी मॉडेलिंग केलं आहे. त्यांची नात लेनी क्रोवेल हिचा हा ब्यूटी ब्रँड आहे. पीपल मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सायमन यांनी कबूल केलं की त्यांच्या मनात या मॉडेलिंगच्या निर्णयाबाबत काहीशी शंका होती. परंतु, ब्रॅण्डच्या एका फॉलोवरकडून ही कल्पना सुचवण्यात आली आणि ही संधी क्रोवेल म्हणजेच त्यांच्या नातीला सोडायची नव्हती. अखेर ९९ वर्षीय हेलेन सायमन उर्फ नाना यांना या मॉडेल शूटसाठी तयार करण्यात आलं. हेलिनला ६ मुलं, ११ नातवंडं आणि ६ पतवंडं आहेत.
क्रॉवेलने पीपलशी बोलताना सांगितलं की, नाना यांनी शूटसाठी आपल्या आवडत्या बास्केटबॉल खेळाडू स्टेफ करीचा छायाचित्रकार सापडल्यानंतरच आपलं मत बदललं आणि त्या शूटसाठी तयार झाल्या. जगभरातून ह्या प्रयोगाची मोठी प्रशंसा होत आहे. नाना या सर्वाधिक वय असलेल्या मेकअप मॉडेलपैकी एक ठरल्या आहेत. ‘नाना इन द स्पॉटलाईट’ या नावाने सेईच्या इंस्टाग्राम पेजवर हे सर्वप्रथम जाहीर करण्यात आलं. नाना म्हणाल्या की, त्यांच्या या शूटचा अनुभव मजेदार होता. दरम्यान, या शूटच्या वेळी त्यांचं कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा गोतावळा असल्याने त्यांना आपलं हसू आवरत नव्हतं.
मी कधीही मॉडेल होण्याचा विचार केला नव्हता!
नाना यांना एका पोस्टद्वारे ९ जुलै रोजी सेईच्या मॉडेलपैकी एक म्हणून सादर करण्यात आलं. ज्यात त्यांचं वर्णन सेईची नंबर १ फॅन म्हणून करण्यात आलं होतं. या पोस्टमध्ये नाना यांनी पांढरा शर्ट घातला आहे आणि तिचं स्मितहास्य मोठी सकारात्मक ऊर्जा देत बहार आणत आहे. नाना यांनी याबाबत बोलताना असंही सांगितलं की, “मी कधीही मॉडेल होण्याचा विचारच केला नव्हता. लहान वयातही मी कधी जास्त मेकअप केला नाही.” मात्र पुढे त्यांनी हे देखील नमूद केलं की, सेई ब्रँडचा मेकअप हा नैसर्गिक लूक देतो. स्लिप टिंट मॉइश्चरायझर, मस्करा १०१, ड्यू ब्लश इन पॉपी आणि लिक्विड लिप बाम ही त्यांची साईची आवडती उत्पादनं आहेत.