उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक नारळपाण्याचे सेवन करतात. नारळपाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे मानले जाते. त्यामुळे बरेच लोक नारळपाण्याचे दररोज सेवन करतात. पण, असे करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तर आज आपण या लेखातून एक कप नारळाच्या पाण्यात किती पोषक घटक असतात? नारळाचे पाणी शरीरासाठी केव्हा नुकसानकारक ठरू शकते याची माहिती जाणून घेणार आहोत. हैदराबादच्या क्लिनिकल डाएटिशियन, केअर हॉस्पिटल्सच्या डॉक्टर सुषमा यांच्या मते, उन्हाळ्याच्या महिन्यांत हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचे पाणी उत्तम पर्याय आहे. त्यातील इलेक्ट्रोलाइट सामग्री घामामुळे शरीराबाहेर पडलेले पाणी भरून काढण्यास मदत करते. ही बाब बाह्य शरीराची हालचाल, चलनवलन किंवा गरम हवामानात व्यायाम केल्यानंतर फायदेशीर ठरू शकते.
डॉक्टर सुषमा यांच्या म्हणण्यानुसार, प्रति २०४ मिली (एक कप) नारळाच्या पाण्यात पुढील पोषक घटक असतात…
कॅलरीज | अंदाजे ४५ kcal |
कर्बोदके | ९ ग्रॅम |
साखर | ग्लुकोज, फ्रक्टोज व सुक्रोज |
प्रथिने | १ ग्रॅमपेक्षा कमी |
फॅट | १ ग्रॅमपेक्षा कमी |
सोडियम | ४५ मिग्रॅ |
पोटॅशियम | अंदाजे ६०० मिग्रॅ (बहुतेक स्पोर्ट्स ड्रिंक्सपेक्षा जास्त) |
सूक्ष्म अन्नद्रव्ये | कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. |
नारळपाण्याचे आरोग्यदायी फायदे –
हायड्रेशन : हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट-समृद्ध पेय आहे; जे व्यायामानंतर किंवा गरम हवामानात रीहायड्रेशनसाठी उत्कृष्ट पर्याय ठरते.
इलेक्ट्रोलाइट : नारळपाण्यातील पोटॅशियम सामग्री घामाने शरीरावाटे निघून गेलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यास मदत करते. स्नायूंच्या कार्यामध्ये मदत करते आणि पोटात होणारी आग टाळण्यास मदत करते.
रक्तदाब : नारळपाण्याच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
हृदयाचे आरोग्य : नारळपाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारून आणि रक्ताच्या गुठळ्या तयार करणे कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत मिळते.
अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म : नारळपाण्यात क जीवनसत्त्वासारखे अँटीऑक्सिडंट्स असतात; जे मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करण्यास आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
मधुमेही नारळपाणी पिऊ शकतात का?
अनेक फळांच्या रसांच्या तुलनेत नारळपाण्यात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असते. तरीही त्यात नैसर्गिक शर्करा असते; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते, असे डॉक्टर सुषमा यांनी स्पष्ट केले. तथापि, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) बहुतेक फळांच्या रस आणि सोडा यांच्या तुलनेत कमी आहे. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी कमी होते. सुषमा यांनी सावधगिरीचा इशारा देत सांगितले की, मधुमेहींनी नारळाच्या पाण्याचे सेवन करताना मर्यादा ठेवली पाहिजे.
गर्भवती महिलांसाठी नारळाचे पाणी फायदेशीर आहे का?
गर्भवती महिलांनी हायड्रेटेड राहणे हे आईचे आरोग्य आणि बाळाचा विकास यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असते. नारळपाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स निर्जलीकरण टाळण्यास, मळमळ, बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतात. त्याव्यतिरिक्त त्याचा नैसर्गिक गोडपणा साखरयुक्त पेय पिण्याची इच्छाही पूर्ण करू शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी हे एक आरोग्यदायी पेय आहे.
लक्षात ठेवण्याजोग्या बाबी
ॲलर्जी – काही व्यक्तींना नारळपाण्याची ॲलर्जीदेखील असू शकते. त्यामुळे नारळपाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
साखरेचे प्रमाण – नारळाच्या पाण्यात नैसर्गिक शर्करा असते. तरीही इतर फळांचे रस आणि स्पोर्ट्स ड्रिंक्सपेक्षा त्यात साखरेचे प्रमाण कमी असते.
अतिसेवन – जास्त प्रमाणात नारळाचे पाणी प्यायल्याने पोटॅशियमचे जास्त सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे हायपरक्लेमिया (पोटॅशियमची पातळी वाढणे) असा परिणाम शरीरात दिसून येईल. हायपरक्लेमियाच्या लक्षणांमध्ये स्नायू कमकुवत होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयविकाराचा झटका येणे यांचा समावेश होतो..
मिथक आणि तथ्ये –
गैरसमज १ : नारळाचे पाणी वैद्यकीय (रीहायड्रेशन सोल्युशन्स) ओआरएसमध्ये बदलू शकते का?
उत्तर – नारळपाण्यात हायड्रेट करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स असतात. पण, त्यात निर्जलीकरणाच्या उपचारांसाठी डिझाइन केलेल्या वैद्यकीय रीहायड्रेशन सोल्युशन्समध्ये सापडलेल्या इलेक्ट्रोलाइट्सचे अचूक संतुलन नसते.
गैरसमज २ : नारळपाणी आरोग्याच्या विविध समस्यांवर उपचार ठरतो का?
उत्तर – नारळपाणी हायड्रेशन आणि काही पौष्टिक फायदे देते. पण, कर्करोग किंवा मधुमेह यांसारख्या आजारांवर हा कोणताही चमत्कारिक उपचार म्हणून काम करीत नाही. फक्त संतुलित आहाराचा भाग म्हणून याचे सेवन केले पाहिजे.
गैरसमज ३ : कोवळ्या नारळाचे पाणी परिपक्व नारळाच्या पाण्यापेक्षा चांगले असते.
उत्तर – कोवळा आणि परिपक्व असे दोन्ही नारळ समान पौष्टिक प्रोफाइलसह नारळाचे पाणी तयार करतात. दोन्हींमध्ये पाण्याची चव आणि प्रमाण यांमध्ये किंचित फरक असू शकतो.
© IE Online Media Services (P) Ltd