तरुण उंदरांचे रक्त वृद्ध उंदरांना दिल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या क्षमता सुधारतात असे संशोधकांना आढळून आले आहे. जर ही बाब माणसाच्या बाबतीत लागू पडली तर त्यामुळे अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व इतर रोगांवर उपाय सापडण्यास मदत होईल, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी म्हटले आहे.
‘नेचर मेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार तरुण उंदरांचे रक्त वृद्ध उंदरांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रेणवीय, न्यूरॉनमधील प्रक्रियांचे निरीक्षण अधिक प्रगत तंत्राच्या मदतीने करण्यात आले. वैज्ञानिकांनी नवीन रक्त दिल्यानंतर त्यांच्या स्मृतीची तुलना प्रमाणित कामगिरीशी केली. या वृद्ध उंदरांना प्लाझ्मा म्हणजे पेशीमुक्त रक्त देण्यात आले होते.
काही उंदरांना प्लाझ्मा दिला नव्हता. या संशोधनातील प्रमुख संशोधक सॉल विलेदा यांनी सांगितले, की तरुण उंदरांचे रक्त वृद्ध उंदरांना दिल्यानंतर त्यांच्या मेंदूच्या क्रियांमध्ये सुधारणा झाल्या याचाच अर्थ मेंदूतील एकदा झालेले बिघाड कायम तसेच राहतात हा समज चुकीचा आहे. टोनी वेस कोरे यांनी यापूर्वी अशाप्रकारचे प्रयोग विलेदा व सहकाऱ्यांसमवेत केले होते त्यातही त्यांना असेच आढळून आले.
 या वेळी संशोधकांनी जे निरीक्षण केले त्यात उंदरांना तरुण उंदरांचे रक्त दिल्याने त्यांच्या मेंदूतील जोडण्या व चेतापेशी यांच्यात सुधारणा झाल्या व स्मृती तसेच अध्ययनक्षमतेत चांगले बदल दिसून आले.
तरुण उंदरांचे रक्त दिल्यानंतर हिप्पोकॅम्पल भागातील चेतापेशींचे केंद्र चांगले काम करीत असल्याचे दिसते. एकप्रकारे जुन्या मेंदूचे चार्जिग तरुण उंदरांच्या रक्तामुळे झाले. जर या उंदरांना दिलेल्या प्लाझ्माला जास्त तापमानाचा सामना करावा लागला तर चांगले परिणाम टिकून राहात नाहीत.
 याचा अर्थ उष्णतेमुळे काही प्रथिनांचा नाश होतो त्यामुळे हे चांगले बदल टिकत नाहीत, त्यामुळे वृद्ध उंदरांना तरुण उंदरांच्या रक्ताचा प्लाझ्मा दिल्यानंतर अध्ययन व स्मृतीत ज्या सुधारणा दिसतात त्या रक्तातून आलेल्या एका प्रथिनावर अवलंबून असतात, असे संशोधकांचे मत आहे.

Story img Loader