कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आता प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीयुक्त झाली आहे. छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीसाठी टेक्नॉलॉजीचा वापर दिसत आहे. सहाजिकच यामुळे आपलं दैनंदिन आयुष्य सोपं झालं. मग या सगळयांमध्ये पावसाळा हा सीजन कसा मागे राहील? पावसाळा म्हटलं की कपडे, चपलांसह छत्र्यांमध्येही नव नवीन ट्रेण्ड येत असतात. नवकल्पनांसह बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या, आणि अन्य फीचर्स असणाऱ्या छत्र्या येत असतात. यंदाही छत्रीमध्ये वेगळं इनोवेशन पाहायला मिळत आहे. केरळ येथी अॅलेप्पी मधील पोपी अंब्रेला मार्टने चक्क Wi-Fi, Bluetooth द्वारे फोनला कनेक्ट होणारी छत्री बनवली आहे! या छत्रीची किंमत १,९५० रुपये एवढी आहे.

कशी काम करते ही छत्री?

छत्री Wi-Fi किंवा Bluetooth द्वारे फोनला कनेक्ट केली जाते. छत्री यशस्वीरित्या फोनला कनेक्ट झाल्यानंतर आपल्या फोनवर एक मेसेज येतो. तो मेसेज अॅक्सेपट केल्यावर तुम्ही छत्रीवर तुम्हाला येणारे कॉल बघू शकता आणि उचलूही शकता. कॉलवर बोलण्यासाठी छत्रीच्या हँडलच्या खालच्या बाजूस दिसत असलेल्या स्पीकरचा वापर करता येतो. तुम्ही फक्त कॉलच घेऊ शकत नाही तर गाणीसुद्धा ऐकू शकता. तुम्ही सहज फोन बॅगमध्ये किंवा खिशात ठेवून गाणी ऐकू शकता किंवा कॉलवर बोलू शकता.

छत्रीचे स्पेसिफिकेशन काय आहेत?

बदलता येणारी बॅटरी या छत्रीमध्ये आहे. तुमच्या वापरानुसार बॅटरी एक ते दोन वर्ष टिकते. तुमच्या स्मार्ट फोनला ही छत्री ३० फुटांच्या आत सहज कनेक्टेड राहू शकते. चुकून या अंतराच्या बाहेर गेल्यास फोनवर नोटीफिकेशनसुद्धा येते. जेणेकरून तुमचा फोन आणि छत्रीचं कनेक्शन तुटलं आहे हे लक्षात यायला मदत होते. छत्रीमध्ये नॅनो पण पॉवरफुल स्पीकर आहेत. आणि २ जी.बी. मेमरी कार्डसह डिझाईन केलेले Sound Adjuster आहे. टेक-सॅव्ही नसलेल्या लोकांसाठी फॅन, वॉकिंग स्टिक आणि म्युझिक असे फीचर्स असणारी छत्रीसुद्धा उपलब्ध आहे. नेहमीच्या काळ्या रंगाच्या, कर्व हँडल पासून ते पाच फोल्ड छत्रीपर्यंत मॉडेल पोपी अंब्रेला मार्टकडे उपलब्ध आहेत. सोबतच रिवर्स छत्री ह्या मॉडेलमध्ये तुम्ही छत्री दुमडल्यावर पटकन कोरडी होते.

छत्री विकणारा एक विक्रेता सांगतो की, “सतत फोन वापरत असलेल्या लोकांसाठी ही छत्री उपयुक्त आहे. आणि पावसात, आपण आपला फोन न वापरता छत्रीचा वापर करता येऊ शकतो जेणेकरून फोन भिजण्याची भीती नाही”.

Story img Loader