AC Blast Prevent Tips: मंगळवारी नोएडाच्या सेक्टर १८ मधील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत काही जणांनी काचा फोडून उड्या मारल्या. या घटनेचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर या आगीमागचं कारण एसीमधील स्फोट असल्याचं म्हटलं जातंय.

उव्हाळा सुरू होताच एसीचा स्फोट झाल्याच्या तसंच त्यामुळे भीषण आग लागल्याच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून समोर येत आहेत. अशातच जर तुमच्या घरीदेखील एसी असेल आणि उन्हाळ्यात तुम्ही त्याचा दिवसरात्र वापर करत असाल तर तुम्हालादेखील काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग यानिमित्ताने एसीचा स्फोट का होतो आणि तो टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे, ते जाणून घेऊया…

ओव्हरलोड (AC Using Tips in Summer)

उन्हाळ्यात एसीचा सतत वापर केल्याने इलेक्ट्रिकल सर्किट्सवर दबाव पडतो, ज्यामुळे वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते. उष्णता वाढत असल्याने एसीची गरज वाढते. बरेच लोक एसी तासन्तास चालू ठेवतात, ज्यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त दाब येतो. यामुळे एसीचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, जास्त वेळ एसी सुरू ठेवणं टाळा. यासाठी तुम्ही एसीमध्ये टायमर सेट करू शकता. असं केल्याने एसी कूलिंग झाल्यानंतर आपोआप बंद होतो. यामुळे स्फोटाचा धोका कमी होतो आणि तुमचे वीज बिल देखील कमी येतं.

खराब देखभाल

धूळ, घाण किंवा फिल्टरची साफसफाई न केल्याने मोटर जास्त गरम होऊ शकते. एसीमध्ये धूळ आणि घाण जमा झाल्याने कूलिंग कॉइल आणि कंप्रेसरवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत एसी लवकर गरम होतो आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते. हा धोका टाळण्यासाठी, एसीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. दर १५ दिवसांनी एअर फिल्टर स्वच्छ करत राहा आणि उन्हाळ्यात एसी सुरू करण्याआधी एकदा त्याची सर्व्हिसिंग देखील करून घ्या.

स्टॅबिलायझर नसणं

बरेच लोक थोडे पैसे वाचवण्याच्या नादात एसी बसवताना स्टॅबिलायझर बसवत नाहीत, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका देखील वाढतो. उन्हाळ्यात व्होल्टेजची समस्या सामान्य असते. अशा परिस्थितीत वीज चढउतारांमुळे एसी कंप्रेसरवर दाब येतो. तसेच स्टॅबिलायझर न बसवल्याने एसीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो.

गॅस लीकेज

जर एसीमध्ये रेफ्रिजरंट गॅस लीक होत असेल आणि जवळपास इलेक्ट्रिक सोर्स असेल तर स्फोट होऊ शकतो. गॅस लीकेजकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत एसीचं सर्व्हिसिंग करताना, गॅस लीकेज देखील तपासा. जर तुम्हाला गॅस लीकेजचा वास येत असेल तर ताबडतोब एसी बंद करा आणि टेक्निशीयनला बोलवा. या काही गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही एसीचा स्फोट होण्याचा धोका टाळू शकताच, परंतु या पद्धती एसी कूलिंगमध्ये सुधारणा करतात आणि तुमचे वीज बिल कमी करतात.

बाहेरचं युनिट साफ न करणं

बरेच लोक एसी सर्व्हिसिंग करताना फक्त एअर फिल्टर स्वच्छ करतात आणि बाहेरील युनिटच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. असं केल्याने एसीमध्ये आग लागण्याची शक्यताही वाढते. कंडेन्सर कॉइल्सचा मार्गात धूळ साचल्याने अडथळे निर्माण होतात. यामुळे एसी नीट काम करत नाही आणि लवकर गरम होऊ लागतो.

कमकुवत वायरिंग

जुने किंवा कमी दर्जाचे वायरिंग उष्णतेमध्ये वितळू शकते, ज्यामुळे आगीचा धोका वाढतो.