धावपळीचे दैनंदिन आयुष्य, बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होणे हा अनेकांच्या दिनक्रमाचाच भाग बनला आहे. अॅसिडिटी म्हणजे आम्लपित्त. याची मुख्य लक्षणे म्हणजे मळमळणे, डोके दुखणे, तोंडाची चव कडवट होणे. अॅसिडिटीचा आणखी एक प्रकार म्हणजे खमूप जळजळ होणे, छातीत आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे. अशा वेळी उलटी, मळमळणे ही लक्षणे असतातच असे नाही. अगदी साधे जेवण आहारामध्ये घेतले तरी अॅसिडिटीचा त्रास होत असल्याची तक्रार अनेक जण करतात.
आहाराच्या वेळा
सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत का याची खात्री करून घ्यावी. कामाच्या स्वरूपानुरूप दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे. कितीही कामामध्ये गुंतले असले तरी दुपारच्या जेवणाची वेळ चुकता कामा नये. सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी. न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी. दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
पथ्ये
शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुढील पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो. भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे. हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वज्र्य करावेत.
घरगुती उपाय
रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते. डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास बराच आराम पडतो.
व्यायाम
अॅसिडिटीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यायाम हा उपयुक्त उपाय आहे. रोज अर्धा तास ते एक तास चालण्याचा व्यायाम करणे फायदेशीर असते. योगतज्ज्ञांकडून पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक आसने शिकून नियमितपणे करावीत. नियमित व्यायामामुळे पचनशक्ती सुधारण्यास आणि पित्त कमी होण्यास चांगला फायदा होतो.
झटपट उपाय धोक्याचे
सर्व गोष्टी जलदरीतीने मिळविण्याची सवय झाल्याने अॅसिडिटीचा त्रास झाल्यास झटपट मोकळे वाटण्यासाठी इनो, सोडा, पेप्सी किंवा कोकसारखी सोडायुक्त पेय घेण्याकडे कल वाढत आहे. काही व्यक्ती तर दैनंदिन अॅसिडिटीच्या गोळ्या घेतात आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. प्रत्येक व्यक्तीला होणारा अॅसिडिटीचा त्रास हा सारखाच असतो असे नाही. तेव्हा या त्रासाच्या गंभीरतेनुसार औषधांची मात्रा ठरते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधांच्या दुकानातून याची औषधे घेऊ नयेत.
वरील झटपट उपायांमुळे अॅसिडिटी तात्पुरती बरी होते. मात्र अॅसिडिटीचे मूळ दुखणे तसेच राहते आणि तिचा त्रास वारंवार होत राहतो. अॅसिडिटीचा असा वारंवार होणारा त्रास टाळण्यासाठी नियमित पथ्य, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे आवश्यक असते.