डाळिंब हे आपल्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. पण, हे डाळिंब तुमच्या त्वचेसाठी, चेहऱ्यासाठी किती उपयोगी आहे हे आज पाहा. डाळिंब हे फळ अँटीऑक्सिडंट्स, पोषक घटक आणि जीवनसत्वांनी भरलेलं आहे. त्यामुळे याचा वापर चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या, कोरडेपणा दूर करण्यास मदत करतो. तसंच चेहरा उजळण्यासदेखील उपयोगी आहे. एकंदरीत तुमच्या त्वचेच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी डाळिंब हा एक रामबाण उपाय आहे. चला तर मग घरच्याघरी डाळिंबाचे १० फेसमास्क/फेसपॅक कसे बनवायचे ते पाहू.
डाळींबाचे फेसमास्क/फेसपॅक कसे बनवावे?
१. डाळिंब आणि दही
डाळिंबाचा रस साध्या दह्यामध्ये मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला व मानेला १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होऊन, त्वचा मऊ होते.
२. डाळिंब आणि मध
डाळिंबाचा रस आणि मध दोन्ही सम प्रमाणात एकत्र करा. आता हे मिश्रण १५ ते २० मिनिटे तुमच्या चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा शांत होऊन तिला आराम मिळतो. चेहरा मऊ होतो आणि टवटवीत दिसतो.
३. डाळिंब आणि ओट्स
ओट्स वाटून त्याची बारीक पूड करा आणि त्यात डाळिंबाचा रस मिसळून घ्या. तयार झालेल्या मिश्रणाने हळूहळू आपल्या चेहऱ्याला मसाज करा आणि १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मृत झालेली त्वचा निघून जाते. चेहरा उजळतो व मऊ राहतो.
हेही वाचा : घरीच बनवा “तंदूरी मसाला”, मिळेल हॉटेलसारखी जबरदस्त टेस्ट, हे घ्या प्रमाण
४. डाळिंब आणि लिंबाचा रस
डाळिंबाच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा गार पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरचे डाग फिके होण्यास मदत होते. चेहऱ्याची त्वचा एकसमान होते.
५. डाळिंब आणि कोरफड
डाळिंबाचा रस कोरफडीच्या गरामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी पडली असल्यास, ती हायड्रेट होण्यास मदत होते. त्याचसोबत त्वचेला थंडावा मिळतो.
६. डाळिंब आणि काकडी
डाळिंबाचे दाणे काकडीच्या फोडींसोबत मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे वाटलेलं मिश्रण तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा.
नंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे चेहरा टवटवीत, तजेलदार होतो.
७. डाळिंब आणि हळद
डाळिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळून तयार मिश्रण डोळ्यांचा भाग सोडून चेहऱ्याच्या उरलेल्या भागाला लावा. १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे चेहरा स्वच्छ होऊन, तो उजळण्यास मदत होते.
८. डाळिंब आणि बदामाचे तेल
डाळिंबाच्या रसात काही थेंब बदामाच्या तेलाचे मिसळून ते चेहऱ्याला लावा. हे मिश्रण १५ ते २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे त्वचेचं पोषण होतं आणि ती अधिक मुलायम बनते.
९. डाळिंब आणि ग्रीन टी
हा मास्क बनवण्यासाठी आधी थोड्या प्रमाणात ग्रीन टी बनवून तो थंड करा. आता थंड झालेल्या ग्रीन टीमध्ये डाळिंबाचा रस मिसळून घ्या. हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी चेहऱ्याला लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमधून तुमच्या त्वचेला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्याने चेहऱ्याची जळजळ कमी होण्यास मदत होते.
१०. डाळिंब आणि ॲव्होकॅडो
पिकलेला ॲव्होकॅडो कुस्करून त्यात डाळिंबाचा रस मिसळून घ्या. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या मास्कमुळे चेहऱ्याला आवश्यक ते पोषण मिळून चेहऱ्याची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.