पौगंडावस्थेत भरपूर फलाहार घेतल्यास महिलांमध्ये पुढील आयुष्यात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्दमधील शास्त्रज्ञांनी गेली २० वर्षे ९०,००० परिचारिकांच्या आहाराचा आणि आरोग्याचा अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले आहेत. ते ‘द बीएमजे’ (पूर्वीचे नाव ब्रिटिश मेडिकल जर्नल) या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

या शास्त्रज्ञांनी अभ्यासात सहभागी झालेल्या परिचारिकांच्या पौगंडावस्थेतील आणि नंतरच्या आयुष्यातील आहाराच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या.

तसेच त्याचा रोग उत्पन्न होण्यावर काय आणि कसा परिणाम होतो ते अभ्यासले. त्यातून असे दिसून आले की, पौगंडावस्थेत मुबलक प्रमाणात फळांचे सेवन केल्यास पुढील आयुष्यात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता २५ टक्क्यांनी कमी होते.

विशेषत: पौगंडावस्थेत सफरचंद, केळी आणि द्राक्षे या फळांचे सेवन फायदेकारक ठरत असल्याचे, तर त्यानंतर तारुण्यावस्थेतील सुरुवातीच्या काळात संत्री खाल्ल्याने फायदा होत असल्याचे आढळून आले. मात्र पौगंडावस्थेत आणि तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात फळांच्या रसाचे सेवन केल्याने काही फायदा होत असल्याचे नेमकेपणाने आढळून आले नाही.

याचप्रमाणे डेन्मार्कच्या काही शास्त्रज्ञांनी विशिष्ट वयात मद्यसेवन केल्याने कर्करोग होण्याच्या शक्यतेत काय फरक पडतो याचा अभ्यास केला. त्यांनी रजोनिवृत्ती झालेल्या २२,००० महिलांच्या आरोग्याचे आणि आहाराचे निरीक्षण केले. त्यात असे दिसून आले की, ज्या महिलांनी रजोनिवृत्तीनंतर पाच वर्षांच्या काळात दररोज पूर्वीपेक्षा दोन पेग मद्य अधिक घेतले त्यांना स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका ३० टक्क्यांनी वाढला होता, पण त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी झाली होती.

ज्या महिलांनी या पाच वर्षांत मद्यसेवन कमी केले त्यांना या दोन्ही रोगांबाबत विशेष फायदा होत नसल्याचे दिसून आले. नियमित आणि ठरावीक प्रमाणात मद्यसेवनाने हृदयरोगात कदाचित फायदा मिळत असेल, पण त्यापेक्षा कर्करोगाचा धोका उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असल्याचे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

Story img Loader