जगभरात गेल्या अडीच वर्षांपासून करोनाने थैमान घातलं आहे. त्यातच मंकीपॉक्स आणि स्वाइन फ्लूचा धोका अजून संपलेला नसतानाच आणखी एका आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. हा आजार म्हणजे ‘टोमॅटो फ्लू’. अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की हा दुर्मिळ विषाणू संसर्ग स्थानिक स्थितीत आहे आणि तो जीवघेणा नाही. परंतु कोविडच्या भयानक अनुभवामुळे, पुढील उद्रेक रोखणे आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वर्षांखालील मुलांना टोमॉटो फ्लूचा धोका अधिक

रिपोर्ट्सनुसार, केरळच्या कोल्लम जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणूचे अनेक रुग्ण आढळले आहेत. आंचल, आर्यनकावू आणि नेदुवाथुरच्या आसपासच्या भागातही काही मुलांना टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाला आहे. लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमधील अभ्यासानुसार, ६ मे रोजी भारतात टोमॅटो फ्लूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला. आतापर्यंत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या ८२ मुलांना त्याचा संसर्ग झाला आहे.

लॅन्सेटच्या अहवालात असे म्हटले आहे की मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका वाढतो कारण या वयोगटात व्हायरल इन्फेक्शन सामान्य आहे. तसेच इतरांच्या संपर्कात आल्याने या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, या आजारात हात, पाय आणि तोंडाच्या आजारासारखी लक्षणे दिसून येतात.

आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी

रोगाची लक्षणे काय?

जेव्हा त्याचा त्रास होतो तेव्हा रुग्णाच्या त्वचेवर लाल रंगाचे फोड दिसतात, म्हणून याला टोमॅटो फ्लू असे म्हणतात. याच्या लक्षणांमध्ये ताप आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. याशिवाय उलट्या, जुलाब, डिहायड्रेशन, शरीरदुखी यांसारख्या समस्याही येतात. काही प्रकरणांमध्ये, अंगांच्या रंगातदेखील बदल दिसून आला आहे.

काय खबरदारी घ्यावी?

  • अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की इतर प्रकारच्या आजारांप्रमाणे, टोमॅटो फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे हा रोग झालेल्या किंवा संशयित रुग्णापासून अंतर राखणे महत्वाचे आहे.
  • जर एखादी व्यक्ती या आजाराला बळी पडली असेल तर तिने ५-६ दिवस विलगीकरणात राहावे. हा आजार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग्य स्वच्छता राखणे, असे या अभ्यासात म्हटले आहे.
  • संक्रमित मुलाने खेळणी, कपडे, अन्न किंवा इतर वस्तू गैर-संक्रमित मुलांसोबत शेअर करणे टाळावे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After monkeypox tomato flu raises parents worries learn how to take care of your children precautions symptoms pvp