वैद्यकीय निष्काळजीपणामुळे दरवर्षी भारतात ५० लाख रुग्ण दगावत असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गंभीर आजारी व जखमी रुग्णांवर उपचाराबाबत विशेष प्रशिक्षण दिल्यास हे मृत्यू निम्म्याने कमी करता येतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

युरोपमध्ये अ‍ॅक्युट क्रिटिकल केअर कोर्स (एसीसीसी) हा विकसित झाला. वैद्यकीय क्षेत्रासाठी तो वरदान ठरला. त्यामुळे गंभीर आजारांमध्येदेखील रुग्ण दगावण्याचे प्रमाण दहा टक्के कमी झाले, असे इंग्लंडमधील रॉयल लिव्हरपूल विद्यापीठ रुग्णालयातील सल्लागार व प्रत्यारोपतज्ज्ञ अजय शर्मा यांनी स्पष्ट केले. अमेरिका व इंग्लंडमधील प्रशिक्षित शल्यचिकित्सकांना याबाबतचा दोन दिवसांचा अभ्यासक्रम सक्तीचा आहे. भारतात अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम विशेषत: ग्रामीण भागात तो ठेवल्यास त्याचा लाभ होईल, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षण दिल्यास रुग्णाची प्रकृती खालावत असल्याचे वेळीच लक्षात आले तर मग नंतर धावपळ करावी लागणार नाही, असे मत एम्सचे माजी संचालक एम.सी.मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. या अभ्यासक्रमात रुग्णाच्या जीवघेण्या आजारावर उपचार करताना छोटय़ा चुका कशा टाळाव्यात याची माहिती दिली जाते. शर्मा व त्यांच्या चमूने भारतात २०१२ पासून तज्ज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. मात्र आतापर्यंत केवळ साडेचारशे डॉक्टरांनीच हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एसीसीसी ही संकल्पना १९८९ मध्ये इंग्लंडमधील हिल्सबोरोग येथील आपत्तीतून पुढे आली. लिव्हरपूल व नॉटिंगहॅम फॉरेस्ट यांच्यातील सामन्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ९६ जणांचा बळी गेला होता, तर ८०० जण जखमी झाले होते.