ऑक्टोबर महिन्यात हवामानातील बदलामुळे हवेची गुणवत्ताही झपाट्याने खालावू लागली आहे. यामुळे थंडीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणचे प्रदूषणही वाढत आहे. प्रदूषणाची पातळी जसजशी वाढत जाते तसतसे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. श्वासोच्छवासाच्या त्रासापासून डोळ्यात जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत. काहींच्या डोळ्यात पाणी येत आहे. यामुळे सध्याची हवा डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक ठरत आहे. पण, अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता. हे उपाय तुमच्या डोळ्यांचे प्रदूषणापासून संरक्षण करू शकतात. चला जाणून घेऊ या उपाय…
१) डोळे थंड पाण्याने धुवा
हिवाळ्यात डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याने डोळे धुणे हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे डोळ्यातील धूळ साफ होते. डोळ्यांच्या खाज सुटण्यापासूनही आराम मिळतो. यासाठी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. यामुळे डोळ्यातील धुळीचे कण साफ होतात आणि डोळ्यांची जळजळ दूर होते.
२) तासनतास फोन आणि लॅपटॉप वापरू नका
आजच्या काळात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बहुतेक लोक त्यांच्या दिवसाचा बराचसा वेळ टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीन पाहण्यात घालवतात. ते सतत पाहिल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासोबतच प्रदूषणामुळे ही समस्या इतकी वाढते की, तुमच्या दृष्टीवर परिणाम होतो. तसेच डोळ्यांमध्ये वेदना आणि सूज वाढते. हे टाळण्यासाठी डोळ्यांना जास्तीत जास्त विश्रांती द्या.
३) डोळ्यांवर बर्फाचा तुकडा फिरवा
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये जास्त खाज सुटण्याची आणि जळजळ होण्याची समस्या होत असेल तर काळजी करू नका. एका सुती कपड्यात बर्फाचा तुकडा ठेवा आणि डोळ्यांना लावा. असे केल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो, तसेच डोळे हलके होतात.
४) डोळ्यांवर बटाटा किंवा काकडी ठेवा
प्रदूषणामुळे डोळ्यातून घाण येण्याबरोबरच तासनतास मोबाईल स्क्रीन पाहिल्याने जळजळ आणि वेदना होतात, त्यामुळे सूजही येऊ लागते. हे टाळण्यासाठी डोळे थंड पाण्याने धुवावेत. यानंतर काकडी आणि बटाट्याचे बारीक स्लाईस कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे काही वेळात आराम मिळेल.
५) बाहेर जाताना चष्मा वापरा
डोळ्यांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी चष्मा वापरा. चष्म्यामुळे हवेतील बारीक कण, प्रदूषित हवा थेट तुमच्या डोळ्यांत जात नाहीत, यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना दूर ठेवता येते.