नवी दिल्ली : भारतामध्ये वायुप्रदूषणामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून आरोग्यावर त्याचे घातक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दशकांत वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या घातक परिणामांमुळे मृत्यूच्या संख्येत अडीच पटीने वाढ झाली आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या नव्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. भारतामध्ये २०१९मध्ये प्रत्येक चार मृत्यूंपैकी एक मृत्यू वायुप्रदूषणाच्या कारणामुळे झाला असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सांगितले. २०१९ या वर्षांतील वायुप्रदूषाणमुळे झालेले परिणाम यांची संख्यात्मक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या वर्षी जगभरात ६६ लाख ७० हजार जणांचा मृत्यू केवळ वायुप्रदूषणाच्या कारणांमुळे झाला आहे. त्यापैकी भारतात १६ लाख ७० हजार आणि चीनमध्ये १८ लाख ५० हजार जणांचे मृत्यू झाले आहेत. वायुप्रदूषणामुळे चार लाख ७६ हजार नवजात बालकांचा मृत्यू जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यात झाला, त्यापैकी भारतातील एक लाख १६ हजार नवजात बालकांचा समावेश आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. खराब हवेची गुणवत्ता हा २०१९मध्ये मृत्यूसाठी चौथा प्रमुख जोखीम घटक होता. उच्च रक्तदाब, तंबाखूजन्य पदार्थाचा वापर आणि निकृष्ट आहार यांमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हवेच्या खराब गुणवत्तेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.

१९९०मध्ये वायुप्रदूषणामुळे दोन लाख ७९ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला, तर २०१९मध्ये मृत्यूंची संख्या नऊ लाख ७९,९०० अशी होती, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.