साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र माणला जातो. या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात. पण या दिवशी सोने खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. सोनं शुद्ध आहे का? हे पडताळणं महत्वाचे आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुद्ध सोनं म्हणजे २४ कॅरेटचंच. पण आजकाल २२ कॅरेटचंच सोनं जास्त विकलं जातं. आता यात नेमका फरक काय तर २४ कॅरेट आणि २२ कॅरेट यामध्ये सोन्याचे प्रमाण वेगळे असते. २४ कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण ९९.९ टक्के असतं, म्हणजे यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते, तर २२ कॅरेटमध्ये ९१.६६ टक्के सोने असते. कॅरेटमध्ये गफलत होऊ नये म्हणून दागिन्यांच्या हॉलमार्कवर सोन्याच्या शुद्धतेची टक्केवारी दिली जाते. समजा आपण २२ कॅरेटची शुद्धता तपासत आहोत, तर २२ ला २४ ने भागून त्याला १०० ने गुणावे, त्यातून जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे त्या सोन्याची शुद्धता असते.

शुद्धता ओळखायच्या पद्धती
चुंबकाचा वापर – लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र सोनं चुंबकाकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे जर सोनं चुंबकाकडे आकर्षिले गेले तर त्या सोन्यात भेसळ आहे असे सहज समजू शकते.

पाण्याचा वापर करा – सोनं पाण्यात कधीच तरंगत नाही. त्यामुळे एका कपात किंवा भांड्यात तुम्ही घेतलेले सोन्याचे दागिने टाका. हे दागिने एका तळाशी राहिले तर ते शुद्ध सोनं आहे आणि जर ते तरंगत वर आले तर ते बनावट सोने असल्याचे समजावे.

अॅसिड टेस्ट – एखाद्या टोकदार वस्तूने सोन्याच्या दागिन्यावर पिनांच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. ओरखडा ओढल्यानंतर त्यावर अॅसिडचा थेंब टाका. थेंब टाकल्यावर जर दागिना हिरवा झाला तर समजून घ्या की तो दागिना बनावट आहे. कारण सोन्यावर कोणत्याही धातूचा परिणाम होत नाही.

हॉलमार्कचं चिन्ह पाहा – सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजन्सीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असते. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो. मात्र काही विक्रेते हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचे आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही आणि ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष तसेच उत्पादकाचा लोगोही असतो. हे सगळे आहे की नाही योग्य पद्धतीने तपासून घ्यायला हवे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya tritiya 2019 24 carat gold and its purity
Show comments