-संदीप आचार्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षात ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांमध्ये मधुमेहाची वाढ वेगाने होताना दिसत असून ही वाढ जीवनशैलीतील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व ताणतणांमुळे झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणांअंतर्गत महाराष्ट्रात शहरी भागात १५.३ टक्के महिलांमध्ये तर १४.६ टक्के पुरुषांमध्ये मधुमेह आढळून आला. ग्रामीण भागातही महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असून १२.४ टक्के महिलांना मधुमेह झाल्याचे स्पष्ट झाले तर १०.७ टक्के पुरुषांमध्ये मधुमेह आढळून आला आहे.

राज्यचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सध्या सुरु असलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत तीन कोटीहून अधिक महिलांच्या आरोग्याची करण्यात आली असून यात तीस वर्षावरील दोन लाख ६,१५२ महिलांना मधुमेह झाल्याचे आढळून आले आहे. तर उच्च रक्तदाब असलेल्या महिलांची संख्या तीन लाख ४४ हजार ६०६ एवढी आहे. या योजनेअंतर्गत मुंबईत एक लाख ३४२० महिलांची तपासणी करण्यात आली असून यात ७४७५ महिलांमध्ये मधुमेह असल्याचे आढळून आले आहे.

आरोग्य विभागाने असंसर्गजन्य आजारांच्या तपासणी मोहीमेंअंतर्गतही गेल्या काही वर्षात महिलांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून आल्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सांगितले. प्रामुख्याने ग्रामीण भागात आरोग्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या या अभियानत ४५ पुढील महिलांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण हे १४० पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. या तपाणीबरोबरच मधुमेह, रक्तदाब व तीन प्रकारच्या कर्करोग तपासणीतून जे निष्कर्ष समोर येत आहेत ते लक्षात घेऊन आरोग्य विभागाने व्यापक जनजागृतीचा कार्यक्रमाही हाती घेतल्याचे डॉ. अंबाडेकार यांनी सांगितले. ज्या महिलांमध्ये मधुमेह असल्याचे दिसून येते त्यांना मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध देण्याबरोबरच जीवनशैलीतील बदल, व्यायाम तसेच आहाराविषयी समुपदेशन केले जाते.

भारताचा विचार करता आगामी काळता भारत ही मधुमेहाची राजधानी बनू शकते असे लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेह व ऐंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. भारतात आजही पन्नास टक्के लोकांना आपल्याला मधुमेह असल्याची कल्पना नाही. ही गंभीर गोष्ट असून शासकीय पातळीवर तसेच जनजागृतीद्वारे जास्तीतजास्त लोकांची मधुमेहाची चाचणी होणे गरजेचे असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. या आजाराविषयी लोकांना शिक्षण द्या ही यंदाच्या जागतिक मधुमेहदिनाची संकल्पना आहे.

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो. भारतात जवळपास सात कोटी ७० लाख लोकांना हा आजार असून यातील पाच टक्के लोकांना संवर्ग एक प्रकारचा मधुमेह असून या रुग्णांना प्रामुख्याने इंन्शुलीनवरच राहावे लागते. तर ९५ टक्के लोकांना संवर्ग दोन प्रकारचा मधुमेह असून योग्य जीवनशैली, समतोल आहार, नियमित व्यायाम व चालणे ठेवल्यास अशा लोकांचा मधुमेह आटोक्यात राहू शकतो. चुकीची जीवनशैली तसेच वाढते ताणतणाव लक्षात घेऊन तरुणवर्गाने वीस वर्षानंतर नियमितपणे मधुमेहाची चाचणी केली पाहिजे. तसेच ज्या पुरुषांच्या कंबरेचा घेर ९० सेमीपेक्षा जास्त व ज्या महिलांमध्ये ८० सेमीपेक्षा जास्त आहे अशांनी मधुमेहाची चाचणी अवश्य केली पाहिजे. किमान सात तास झोपणे गरजेचे असून तेलकट तुपकट खाणे तसेच जंक फुड खाणे टाळले पाहिजे असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

मधुमेह व संबंधित गुंतागुंतीमुळे देशात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुमारे साडेसहा लाख एवढी आहे. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर ४.९ टक्के असे हे प्रमाण असून महाराष्ट्रात हेच प्रमाण ९.८ टक्के इतके असल्याचे आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेच्या अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्रात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणत मधुमेह आढळून येत असून महिलांमधील मधुमेह रोखणे हे एक आव्हान बनल्यचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alarming increase in diabetes among women the prevalence of diabetes is higher in women than in men msr