अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातील संशोधन

संध्याकाळी घेतलेले मद्याचे काही घोट थेट तुमच्या स्मृतीच्या घडणीवर परिणाम करू शकतात. हा परिणाम अगदी मूलभूत आणि रेणूय स्तरावर होतो, असे एका अभ्यासातून दिसून आल्याचा संशोधकांचा दावा आहे.

मद्याच्या किंवा इतर कोणत्याही नशेच्या व्यसनावर मात करण्याचे उपचार करताना व्यसनी व्यक्ती सुधारल्यावर ती पुन्हा या व्यसनाकडे वळण्याचा धोका असतो. हे उपचार यशस्वी करताना प्रामुख्याने या आव्हानाचा सामना करावा लागतो, असे अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.

फळांवरील माशांनाही मद्याची चटक लागलेली असते. या माशांमध्ये चांगल्या फलदायी गोष्टी आणि त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींची स्मृती विकसित होण्याची प्रक्रिया ही मानवाप्रमाणेच असते. त्यामुळे या अभ्यासासाठी या माशा उपयुक्त नमुना ठरतात, असे संशोधक सांगतात. फळमाशांवरील हे संशोधन जर्नल न्युरॉनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार मद्यामुळे या माशांमध्ये अशी स्मृती तयार होण्याचा मार्ग त्यांच्या नियंत्रणात राहत नाही, तसेच चेतातंतूंद्वारे जाणीव करून देणाऱ्या प्रथिनांमध्ये बदल घडून येतो. त्यामुळे त्यांच्यात मद्याची तीव्र आसक्ती तयार होते. सुपरिणामांची जाणीव करून देणाऱ्या स्मृतींची घडण आणि त्या टिकवण्याच्या प्रक्रियेतील रेणूय संदेशन मार्ग तसेच जनुकीय प्रतिसादांमधील बदलांचा शोधही शास्त्रज्ञांनी लावला आहे.

चेतासंस्थेसाठी घातक असलेले अमली पदार्थ प्रत्यक्षात सुपरिणामांच्या स्मृती कसे जागवू शकतात, हेसुद्धा आम्हाला पाहायचे होते, असे ब्राऊन विद्यापीठातील सहायक प्राध्यापक कार्ला काऊन यांनी सांगितले. अशा प्रक्रियेसाठी प्रथिनांची गरज असते, असे या संशोधकांना आढळले.

मानवामध्ये स्मृती जागृतीचा मार्ग कार्यरत होण्यासाठी वाईनचा एक प्याला पुरेसा असतो. त्यानंतर तासाभरात माणूस सर्वसाधारण स्थितीत येतो. तासातासाने तीन प्याले रिचवल्यावर २४ तासांतही पूर्वस्थितीला येता येत नाही. स्मृती यंत्रणेत जनुकीय संदेशनात बदल झाल्याने हे घडत असावे, असे काऊन यांनी सांगितले.