आसिफ बागवान

अ‍ॅपलच्या उत्पादनांचा विषय निघतो तेव्हा पहिलं नाव येतं ते आयफोनचं. त्यानंतर मग मॅकबुक किंवा अलीकडच्या काळात आलेल्या आयवॉचबद्दल भरभरून बोललं जातं. पण अ‍ॅपलच्या एका उत्पादनाची चर्चा त्याच्या गुणवत्ता आणि क्षमतेच्या तुलनेत नेहमीच कमी होत राहिली. ते गॅजेट म्हणजे ‘आयपॅड’. परंतु, गेल्या दीड-दोन वर्षांच्या करोनाकाळात या गॅजेटचे महत्त्व उमगून आल्याचे या वर्षातील विक्रीचे आकडे सांगतात. ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन शिक्षण ही याची प्रमुख कारणे असली तरी, ग्राहकांचा टॅब्लेट उपकरणांच्या उपयुक्ततेबद्दलचा विस्तारत चाललेला दृष्टिकोनही याला कारण असू शकतो. त्याबरोबरच आयपॅडमधील वैविध्यही या गॅजेटच्या पसंतीमागचे एक कारण आहे. अ‍ॅपलने सप्टेंबरमध्ये भारतात आणलेला आयपॅड (नववी आवृत्ती) अशाच वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे गॅजेट आहे.

सप्टेंबरमध्ये नवनवीन उत्पादनांची घोषणा करताना अ‍ॅपलने आयपॅड मिनी आणि आयपॅड प्रो ही उत्पादने प्रामुख्याने अधोरेखित केली. मात्र, पारंपरिक आयपॅडमध्ये अंतर्भूत झालेली वैशिष्ट्येही नजरेआड करता येत नाहीत. या वर्षी अ‍ॅपलने आयपॅड मिनी, आयपॅड प्रो, आयपॅड एअर आणि आयपॅड अशी चार टॅब्लेट श्रेणीतील उत्पादने बाजारात आणली. त्यापैकी ‘आयपॅड’ हे सर्वात कमी किमतीचे आहे. साधारण ३० हजार ९०० रुपयांपासून सुरू होणारा आयपॅड हा मूळच्या आयपॅडची सुधारित आवृत्ती आहे, हे निश्चित. मात्र, त्यासोबतच आपल्या नवीन भावंडांतील गुणही त्याने आत्मसात केले असल्यामुळे तो अधिक दर्जेदार बनला आहे.

स्क्रीन : कोणत्याही टॅब्लेटची स्क्रीन हा त्याच्या पसंतीक्रमातील पहिला निकष असतो. त्यामुळे १०.२ इंच आकाराचा रेटिना डिस्प्ले असलेला आयपॅड निश्चितच लक्ष वेधून घेतो. यामध्ये प्रथमच ‘ट्रू टोन’ वैशिष्ट्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे भोवतालच्या वातावरणातील प्रकाशानुसार आयपॅडची स्क्रीन आपला प्रकाश ‘अ‍ॅडजस्ट’ करते. ‘रेटिना डिस्प्ले’ हे वैशिष्ट्य अ‍ॅपलच्या उत्पादनांत गेल्या काही वर्षांपासून असून वापरकत्र्याच्या डोळ्यांना प्रकाशाचा होणारा त्रास कमी करण्यात या वैशिष्ट्याची मोठी भूमिका आहे.

प्रोसेसर

अ‍ॅपलने ‘आयपॅड’ला ए१३ बायोनिक चिपची जोड दिली आहे. हा आतापर्यंतच्या आयपॅडमधील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असून त्याची प्रचीती आयपॅड हाताळताना प्रत्येक टचनिशी येते. मल्टीटास्किंग करायचे असो वा एखादा गेम खेळायचा असो, आयपॅडच्या या आवृत्तीत तुम्हाला कोठेही क्षणाचाही अडथळा जाणवत नाही. आधीच्या आयपॅडच्या तुलनेत हा २० टक्के अधिक वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आहे.

कॅमेरा

आयपॅडमध्ये पुढील बाजूने १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा पुरवण्यात आला आहे. आयपॅड प्रोमध्येही त्याच क्षमतेचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. या कॅमेऱ्यात ‘सेंटर स्टेज’चे तंत्र विकसित करण्यात आले आहे. म्हणजे, कॅमेऱ्यात फोकसमध्ये असलेली व्यक्ती जशी हालचाल करते अथवा मागेपुढे होते, तसा कॅमेरा आपोआप ‘अ‍ॅडजस्ट’ होतो. अ‍ॅपलच्या फेसटाइम चॅटिंगसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी हा चांगला पर्याय आहे. याशिवाय ‘शॉट व्हिडीओ’ बनवण्याकरिताही हा पर्याय अतिशय चांगला आहे. आयपॅडचा मागील बाजूचा कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा असून तो १०८०पी एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा पुरवतो. यामध्ये अगदी स्लो मोशन रेकॉर्डिंगचीही सुविधा आहे. टॅब्लेट श्रेणीतील अन्य उत्पादनांत ही सुविधा फारच कमी वेळा आढळते.

ऑपरेटिंग सिस्टिम

आयपॅडची ऑपरेटिंग सिस्टिम ही अद्ययावत अशी आयओएस १५ ऑपरेटिंग सिस्टिम आहे. ए१३ बायोनिक प्रोसेसरमुळे ही ऑपरेटिंग सिस्टिम अतिशय जलद आणि सहजपणे कार्य करते. त्यामध्ये मल्टिटास्किंग, क्वीक नोट्स असे पर्याय उपलब्ध होतात. एवढेच नव्हे तर या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ‘लाइव्ह टेक्स्ट’ ओळखून टिपण्याचे वैशिष्ट्यही पुरवण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या मजकुरावर कॅमेरा फिरवताच त्यातील मजकूर आयपॅड टिपतो. यामध्ये भाषांतराचीही अंतर्भूत सुविधा पुरवण्यात आली आहे. ही सुविधा विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त अशी आहे.

स्टोअरेज

आयपॅडमध्ये सर्वात मोठा बदल हा त्याच्या स्टोअरेजशी संबंधित आहे. आतापर्यंत अ‍ॅपलने आयपॅडमध्ये ३२ जीबीपर्यंतची स्टोअरेज पुरवली होती. मात्र, आता किमान ६४ ते कमाल २५६ जीबीपर्यंतची स्टोअरेज उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयपॅडच्या आधुनिक वैशिष्ट्यांसह त्याचा वापर करताना लागणारी स्टोअरेजची गरज हा आयपॅड निश्चितच भागवतो.

Story img Loader