नोकियाच्या ३३१० ची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. हा फोन रिलाँच करण्यात येणार असल्याची बातमी वा-यासारखी पसरली. हल्ली जो तो स्मार्ट फोन वापरत असला तरी या जुन्या फोनशी अनेकांची इमोशनल अटँचमेंट जोडली होती. बार्सेलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या या जुन्या फोनचे रिलाँचिंग केलं. ठरल्याप्रमाणे रविवारी या कार्यक्रमाचे फेसबुक आणि युट्युबवर प्रक्षेपण दाखवण्यात आले. नोकिया ३३१० च्या नव्या लूकने सगळ्यांनाच वेड लावले आहे.

नव्या रंगात आणि नव्या ढंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. २.४ इंचाचा डिस्प्ले, ड्युएल सिम आणि २ मेगापिक्सेल कॅमेरा असे या फोनचे वैशिष्टये  असणार आहे. त्याच बरोबर मायक्रो एसडी स्लॉटही असणार आहे. या फोनचा युएसपी होता ती दीर्घ बॅटरी लाईफ आणि अपेक्षेप्रमाणे २२ तासांपर्यंतचा टॉक टाईम आणि १ महिन्यापर्यंत सँडबाय बॅटरी लाईफचा दावा नोकियाने केला आहे. विषेश म्हणजे या फोनमधला सगळ्यांचा आवडता स्नेक गेम अपडेटेड व्हर्जेनमध्ये या फोनमध्ये उपलब्ध आहे.

लाल, निळा, पिवळा आणि करड्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. ३ हजार ४०० रुपयांच्या आसपास या फोनची किंमत असणार आहे. या फोनचं रविवारी रिलाँचिंग करण्यात आलं असलं तरी भारतात मात्र जून किंवा मेमध्ये हा फोन उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जातेय. मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने आपल्या ३३१० बरोबर नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ या फोनचे लाँचिंग केलं. त्यातला नोकिया ६ हा फोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला होता. स्मार्टफोनच्या जमान्यात नोकिया कधीच मागे पडली. पण या फोनच्या लाँचिंगमुळे मोबाईल मार्केटवर पुन्हा एकदा या कंपनीला राज्य गाजवण्यास यश येईल की नाही हे पाहण्यासारखे ठरेल.

Story img Loader