प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. पण, सगळ्यांनाच या विषयावर बोलायला आवडतं असं नाही. काहींना पैशांबद्दल बोलताना अवघडल्यासारखंदेखील वाटू शकतं. कारण पैसा या एका शब्दाभोवती मनुष्याच्या कितीतरी भावना जोडलेल्या असतात. जसं की, काहींना पैसा कमावण्याचा आनंद असतो, तर काहींना कमावलेला पैसा गमावण्याची भीती असते. काहींना पैसा अपुरा पडण्याचं दुःखं असतं, तर काही नात्यांमध्ये पैशाबद्दल बोलणं शक्यतो टाळलंदेखील जातं.
“अशा पद्धतीच्या कितीतरी भावना मनुष्याच्या मनात सतत धुसफूसत असतात. जेव्हा आपल्या या भावना बाहेर पडण्यासाठी वाट शोधत असतात, तेव्हा मनुष्य त्याचा शांत राहण्याचा स्वभाव सोडून देतो आणि भावनांचा उद्रेक होतो. तुमच्या अशा वागण्याचा परस्पर संबंध हा तुमच्या खर्चाच्या सवयीशी जोडलेला आहे. पैशांसोबत असलेल्या नात्याकडे आपण नाजूकपणे लक्ष दिलं पाहिजे. आपण इतर ठिकाणी ज्या पद्धतीने वागतो, त्याच प्रकारे आपण आपल्या आर्थिक गरजांसोबतही वागत असतो”, असं मानसोपचारतज्ज्ञ एमिली एच सँडर्स [Psychotherapist Emily H Sanders] यांनी आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेयर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यानुसार खर्च करण्याची कोणकोणती कारणं असू शकतात हे बघू…
हेही वाचा : स्त्रियांनो, शरीराला आवश्यक असणाऱ्या ‘या’ घटकाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
कोणकोणत्या कारणांमुळे व्यक्ती खर्च करतो?
१. कोणत्याही खास प्रसंगी
खास प्रसंग म्हणजे एखादा सण असो, मित्रांसोबत बाहेर जाणं, यांसारख्या प्रसंगांमध्ये व्यक्ती आपल्या ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक खर्च करतो. याला कारणदेखील तसंच आहे. आपल्या सोबत असणाऱ्या इतर लोकांप्रमाणे आपणही खर्च करणं गरजेचं आहे, अशाप्रकारचा नकळत एक मानसिक दबाव मनुष्यावर येतो, परिणामी अतिरिक्त खर्च होतो.
२. स्वतःच्या आनंदासाठी केला जाणारा खर्च
अशा प्रकारे खर्च करण्याला ‘रिटेल थेरपी’ असेदेखील म्हटले जाते. यामध्ये व्यक्ती त्याच्या आवडत्या वस्तूंवर खर्च करताना, डोक्यातील इतर विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो. त्यामुळे खर्च करताना त्यांना आनंद मिळतो. अशा आनंदासाठी कधीकधी ते गरजेपेक्षा जास्त खर्च करतात.
३. इतरांचे अनुकरण
आपण ज्या समाजात राहतो, त्यांच्यानुसार राहण्यासाठी काही जण गरज नसताना खर्च करतात. काहीवेळेस हे खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.
४. अजून थोड्या खर्चाने काय फरक पडणार आहे?
एखाद्या व्यक्तीने त्याने ठरवलेल्या बजेटच्या बाहेर खर्च केल्यानंतर, पुढच्यावेळी खर्च करताना त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता नसते. कारण ‘आधीच इतका खर्च झाला आहे, त्यात अजून थोड्या खर्चाने काय फरक पडणार आहे?’ असा विचार करतात आणि गरजेपेक्षा जास्त खर्च करून बसतात.
५. ओमनियमिया [Oniomania]
ओमनियमिया म्हणजे अशी व्यक्ती, जिला खर्च करण्याचं व्यसन आहे. ज्या व्यक्तींना खर्च करण्याचं व्यसन असतं ती व्यक्ती कुठल्याही गोष्टींवर खर्च करू शकते. कधीकधी या व्यक्ती अशा गोष्टीदेखील खरेदी करतात, ज्याचा त्यांना काहीही उपयोग नसतो.