ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्सना केवळ एका दिवसात डिलिव्हरी मिळणार आहे. आतापर्यंत कंपनीकडून ग्राहकांना दोन दिवसांमध्ये डिलिव्हरी मिळत होती. पण, जपान किंवा अन्य काही देशांमध्ये आधीपासूनच अॅमेझॉनकडून एक दिवसात डिलिव्हरी दिली जात आहे.
आता जगभरात ज्या देशांमध्ये आम्ही सेवा पुरवतो त्या सर्व देशांमध्ये ग्राहकांना ऑर्डर केल्यानंतर केवळ एका दिवसातच डिलिव्हरी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, प्राइम मेंबर्ससाठी ही सुविधा केव्हापासून सुरू होणार याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याचं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
अॅमेझॉनद्वारे ही घोषणा झाल्यानंतर लगेचच गुरूवारी कंपनीच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी अॅमेझॉनने 800 मिलियन डॉलर्स खर्च करण्याची तरतूद केली आहे. या निर्णयामुळे अॅमेझॉनच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान निर्माण होऊ शकतं. सध्या कंपनीचे केवळ 20 ते 25 टक्के प्रोडक्ट्स ऑर्डर केल्याच्या दोन तासांमध्ये किंवा त्याच दिवशी डिलिव्हर केले जातात.