अमिताभ बच्चन यांची नात नव्या ही बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरीही ती तिचे विचार आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच नव्याने महिलांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याबद्दल आपले विचार स्पष्ट केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी अमिताभ बच्चनही तेथे उपस्थित होते.
एनडीटीव्हीच्या एका विशेष कार्यक्रमात नव्या नवेली नंदा हिने आपले आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासह हजेरी लावली. यामध्ये तिने महिलांच्या आरोग्याशी निगडित वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार स्पष्ट केले. यावेळी ती म्हणाली की प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा ती आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकणार नाही. ती पुढे म्हणाली की आपल्या देशात महिलांची मासिक पाळी आणि मानसिक स्वास्थ्याला टाबू बनवणे बंद केले पाहिजे. लोकांनी या विषयावर आपला मित्रपरिवार आणि कुटुंबियांशी बोलणे आवश्यक आहे.
नव्या म्हणाली, “मासिक पाळीला आपल्या देशात एक निषिद्ध गोष्ट म्हणून समजले जाते. आपल्याकडे महिलांना योग्य आरोग्य आणि स्वच्छता देण्यास अजून बराच काळ लागेल, मात्र आता यामध्ये प्रगती दिसून येत आहे. मी या विषयावर माझ्या आजोबांसमोर बोलू शकते ही सुद्धा एक प्रगती आहे.”
नव्या स्वतःला भाग्यवान समजते की ती या विषयांवर आपल्या कुटुंबियांशी उघडपणे बोलू शकते. ती या कार्यक्रमात म्हणाली की महिला आणि तरुण मुलींची विषयांवर बोलण्यापासून अडवणूक केली जाऊ नये. मात्र, त्याचबरोबर काही पुरुषही आता पुढाकार घेऊन या गोष्टींविषयी बोलत आहेत आणि जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. नव्याच्या मते, या गोष्टींची सुरुवात आपल्या घरूनच व्हायला हवी. समाजात या विषयी बोलण्याआधी, प्रत्येक महिलेला स्वतःच्या घरातही आपल्या शरीराला घेऊन कम्फर्टेबल वाटायला हवं.
नव्या ‘आरा’ आरोग्य संस्थेची आणि ‘प्रोजेक्ट नवेली’ची संस्थापक आहे. याअंतर्गत ती शैक्षणिक, आर्थिक, स्वातंत्र्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधीच्या असमानतेविरुद्ध लढा देते.