आयुर्वेद ही प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धत आहे आणि त्यामध्ये जवळपास प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या औषधींचे भांडार आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन, त्या समस्येवर उपाय आयुर्वेदाद्वारे केला जातो. सध्या आपण प्रत्येक जण रसायनयुक्त शाम्पू किंवा इतर उत्पादनांचा वापर करीत असल्याने अनेकांना केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, या समस्येवर आपल्या आयुर्वेदात अनेक उपाय आहेत; ज्यांचा फायदा कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.
केस गळण्यापासून ते डोक्याला खाज येणे, कोंडा होणे किंवा इतर त्रासांसाठी सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पतींचा उपयोग कसा करायचा याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून मिळते, ती आपण पाहू.
आवळा
आवळा हा अगदी सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असून, त्यामध्ये फायबरचेही प्रमाण जास्त आहे. तसेच, आवळ्यात प्रथिने असून, त्याचा फायदा त्वचा आणि केसांसाठी होतो. आवळ्यातील लोह हा घटक केसांची मुळे पांढरी होण्यापासून रोखण्यास मदत करतो आणि केसवाढीसाठीही तो फायदेशीर असतो.
केसांसाठी काही जण आवळ्याची पेस्ट करून डोक्यावर लावतात; तर काही जण आवळा खाऊन, त्याच्या पोषक घटकांचा फायदा घेतात. पावडर वा रस स्वरूपातील आवळ्याचा वापरदेखील केसांसाठी उपयुक्त ठरू शकतो. सकाळी रिकाम्या पोटी, रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाण्यात आवळ्याचा रस वा पावडर मिसळून, प्यायल्यानेदेखील केसांसाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
कोरफड
फायबरयुक्त कोरफड केस, त्वचा यांसाठी फायदेशीर असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोरफडीचा गर हा डोक्यावरील त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, तसेच पोषणाचे काम करतो. कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी आणि केसांना दोन तास लावून ठेवा आणि नंतर सौम्य शाम्पूने केस धुऊन टाका. असे केल्याने केसांसाठी फायदा होतोच; पण त्याचबरोबर डोक्याला येणारी खाज किंवा कोरडी त्वचा यांपासूनही आराम मिळू शकतो.
भृंगराज
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वाधिक ओळखली जाणारी औषधी वनस्पती म्हणजे भृंगराज. अनेक शाम्पूमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. भृंगराज वनस्पती केसांना मजबूत आणि घनदाट बनविण्यास मदत करते. जीवाणू आणि बुरशी दूर करण्याचे भृंगराजमधील गुणधर्म डोक्याच्या त्वचेला होणाऱ्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. तसेच, केस तुटणे व गळण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठीही ही वनस्पती उपयुक्त ठरू शकते.
[टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]