Anti-ageing tips : तुमचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात, विशेषत: त्वचेवर हे बदल पटकन दिसून येतात. सध्याच्या बदलच्या जीवनशैलीमुळे आता लहान वयातचं अनेकांना अकाली वृद्धत्व येऊ लागले आहे. डोळे, ओठ कोरडे पडणे, डोळे, ओठांच्या बाजूला सुरकुत्या, केस सफेद होणे आणि तोंडाभोवती बारीक रेषा दिसणे या अकाली वृद्धत्वाच्या खुणा आहेत. यामुळे जीवनशैलीत अनेक बदल करून तुम्ही अकाली वृद्ध टाळू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंंवा त्वचेवर अकाली वृद्धत्वाच्या खुणा रोखण्यासाठी आणि शरीर निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घेऊ…
याबाबत एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत कॉस्मेटोलॉजिस्ट आणि इंटरनॅशनल एस्थेटिक्सच्या एमडी डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी माहिती दिली की, चेहऱ्यावर दिसणाऱ्या उभ्या रेषा, सुरकुत्या, केस सफेद होणे ही अकाली वृद्धत्वाची सामान्य लक्षणे आहेत. अनेकांना वयाच्या आधीच त्वचेवर अकाली वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. ३५ वर्षांपेक्षा कमी वयात त्वचेवर खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला अकाली वृद्धत्व येत असल्याचे समजून जा. अकाली वृद्धत्वामध्ये त्वचेवर सनस्पॉट्स, त्वचा कोरडी होणे, खाज येणे, निस्तेज दिसणे, गाल, डोळे खोल जाणे, छातीभोवती हायपरपिग्मेंटेशन ही लक्षणे दिसतात.
अकाली वृद्धत्व कशामुळे येते?
त्वचेतील तरुणपणा आणि लवचिकता टिकून ठेवणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिन या दोन प्रोटीनच्या कमरतेमुळे त्वचा निस्तेज, पातळ आणि सुरकुलेली दिसते. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर लगेच काळे डाग दिसू लागतात. पापण्या आणि भुवया खराब होतात. तुमच्या कुटुंबात जर कोणाची त्वचा वयाआधी सुरकुत्या पडलेली आणि हायपरपिग्मेंटेशन असलेली असेल तर तुम्हालाही ही लक्षणं लवकर दिसण्याची शक्यता असते. याशिवाय खराब हवामान, खाण्यापिण्याच्या वाईट सवयींचा परिणामही त्वचेवर होत असतो.
कारण त्वचा हा एक जिवंत अवयव आहे ज्याला नवीन पेशी निर्माण करण्यासाठी योग्य पोषक तत्वांची गरज असते. अति साखर, कॅफीनच्या सेवनासह खराब आहार, धुम्रपान यामुळेही त्वचेतील हायड्रेशन कमी होते आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. यासह वेळी अवेळी झोप, खूप जास्त मानसिक आणि भावनिक ताण यामुळे तुमच्या त्वचेचे वय लवकर वाढलेले दिसते.
अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी खालील उपाय वापरा
१) सूर्य किरणांपासून संरक्षण करा
चेहऱ्याचे अतिनील सूर्य किरणांपासून संरक्षण करा. दुपारच्या कडक उन्हात गरज नसल्यास जाऊ नका. उन्हात त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी कपाळ, नाक, डोळे टोपी किंवा स्कार्फने पूर्ण झाका. सनस्क्रीनचा वापर करा. हिवाळ्यातही बाहेर जाताना SPF 30 आणि त्यावरील सनस्क्रीन निवडा. तसेच सनस्क्रीन ब्रॉड-स्पेक्ट्रम असल्याची खात्री करा, म्हणजे ती UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करेल. उन्हात जाताना शक्यतो सैल, हलके, लांब बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट किंवा लांब स्कर्ट घाला.
२) अधिक अँटिऑक्सिडंट्सचे सेवन करा.
अँटिऑक्सिडंट्स त्वचेला हानीकारक रॅडिकल्सशी लढण्यासाठी तसेच वृद्धत्वाची चिन्हे रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शरीरास पुरेसे अँटिऑक्सिडंट्स पोहचवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अन्न. अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांमध्ये ब्रोकोली, पालक, गाजर, शतावरी, एवोकॅडो, बीट, मुळा, रताळे, स्क्वॅश, भोपळा, हिरव्या भाज्या, बेरी, सफरचंद,, लाल द्राक्षे यांचा समावेश आहे. यात पुरेसे पाणी पिणेही महत्वाचे आहे.
३) एक्सफोलिएटिंग टोनर
आपला चेहरा वारंवार स्वच्छ करणे हा अकाली वृद्धत्व टाळणारा पहिला उपाय आहे. यात चेहऱ्यावरील छिद्र, पुरळ, डाग घालवण्यासाठी चेहरा दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री धुवा. मेकअप रिमूव्हरने मेकअप काढा आणि योग्य क्लीन्झरने चेहरा स्वच्छ करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि मऊ टॉवेलने हळूवारपणे कोरडा करा, यामुळे चेहराची जळजळ कमी होईल. चेहरा टोनरने स्वच्छ केल्यानंतर आणि इतर काहीही लावण्यापूर्वी तुम्ही चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. चेहऱ्यावर अल्फा आणि बीटा हायड्रॉक्सी ऍसिड, गुलाबपाणी, ग्रीन टी, व्हिटॅमिन ई आणि सी यासारख्या गोष्टींचा वापर करु शकता
४) मॉइश्चरायझर लावा.
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझरमधील तेले शरीरातील ओलावा टिकून ठेवते. यामुळे त्वचेसाठी व्हिटॅमिन सी, ग्रीन टी अर्क, व्हिटॅमिन ए किंवा रेटिनॉइड्स असलेले मॉइश्चरायझर लोशन शोधण्याचा प्रयत्न करा. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या दिसून येतात
५) बायो-रिमॉडेलिंग उपचार
तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही अँटी-एजिंग त्वचेच्या समस्येवर उपचार केले जाऊ शकतात. एक ब्रेक-थ्रू अँटी-एजिंग ट्रिटमेंट ज्यामध्ये त्वचा रिमॉडेलिंग होते, यामुळे त्वचेतील लवचिकता, तरुणपणा टिकूण ठेवत अकाली वृद्धत्वाची लक्षणे रोखता येतात.
100 टक्के शुद्ध हाइलूरोनिक ऍसिडचे बनलेल्या ट्रिटमेंटमध्ये त्वचेचा पोत सुधारतो, बारीक रेषा निघून जातात आणि चेहऱ्याची त्वचा घट्ट होते. याव्यतिरिक्त मान, डेकोलेटेज आणि हातांवर वापरण्यासाठी सुरक्षित आहे. टी-एजिंग ट्रिटमेंटमध्ये वृद्धत्वाच्या मुख्य लक्षणांवर उपचार केले जातात, केवळ वृद्धत्वाची लक्षणांवरचं नाही तर त्यावर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी देखील ही ट्रिटमेंट फायदेशीर ठरते.
६) व्यायाम आणि चांगली झोप
नियमित व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि झोपेमुळे त्वचा आणि हाडांचे आरोग्य आणि मूड सुधारतो. कारण व्यायामादरम्यान येणाऱ्या घामाद्वारे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. शिवाय व्यायामानंतर कोर्टिसोल कमी होते ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. यासह नियमित वेळेत झोपण्याचा प्रयत्न करा. यात रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. रोजची सात ते नऊ तासांची दर्जेदार झोप दिवसभरातील ताणतणाव दूर करण्यात मदत करेल आणि तुमच्या त्वचेची पोत सुधारण्यासही मदत होईल.