Anti-Valentine’s Week 2024 : फेब्रुवारी महिना हा एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी फारच खास असा महिना असतो. याचे कारण म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि त्याबरोबर साजरा केला जाणारा व्हॅलेंटाइन्स वीक. यामध्ये दररोज एक खास दिवस साजरा केला जातो. उदाहरणार्थ रोज डे, चॉकलेट डे, किस डे वगैरे-वगैरे. फेब्रुवारीमधील ७ तारखेपासून १४ तारखेपर्यंतचा आठवडा हा प्रेम दर्शविण्याचा आणि त्याचा स्वीकार करण्याचा असतो, असे आपण म्हणू शकतो.
मात्र तुम्हाला माहीत आहे का की, या व्हॅलेंटाईन डेला जोडूनच आणखी एक आठवडा साजरा करण्याचा ट्रेंड आहे. त्या आठवड्याचे नाव आहे, ‘अँटी व्हॅलेंटाईन वीक’ [Anti-Valentine’s Week]. या आठवड्यात ब्रेकअप झालेल्या किंवा सिंगल मंडळींसाठी काही खास दिवस आहेत. हा आठवडा १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. इतकेच नाही तर, व्हॅलेंटाईन वीकप्रमाणेच दररोज एक खास दिवस यात साजरा केला जातो. ते दिवस कोणते आणि ते का साजरे केले जातात हे जाणून घेऊ.
हेही वाचा : Kiss Day 2024 : चुंबनाचे प्रकार किती? कोणत्या Kiss चा काय अर्थ असतो, जाणून घ्या…
Anti-Valentine’s Week : दिवस आणि त्यांचे अर्थ
१. स्लॅप डे
स्लॅप डेच्या नावातच त्याचा अर्थ आहे. स्लॅप म्हणजे थोबाडीत मारणे. हा दिवस १५ फेब्रुवारी म्हणजे आज साजरा केला जातो. आता याचा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. या दिवशी तुमच्या एक्सने किंवा प्रियकराने तुमच्या भावना दुखावल्या असल्यास त्या भावनांमधून, दुःखामधून, रागातून बाहेर पडण्याचा हा दिवस. तुमच्या मनातील भावना व्यक्त करा आणि त्यांना तुमच्या मनातून ‘स्लॅप’ करून बाहेर घालवा.
२. किक डे
किक म्हणजे लाथ मारणे. याचा अर्थ तुमच्या एक्सला धडा शिकवण्यासाठी ‘किक’ करून येणे असा होत नाही. याउलट तुम्ही स्वःकडे लक्ष द्या. वाईट भावनांना, नकारात्मक उर्जेला, वाईट आठवणींना तुमच्या मनातून हाकलून लावा. हा दिवस १६ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
३. परफ्युम डे
एखादा दुर्गंध घालवण्यासाठी आपण सुगंधी अत्तर किंवा परफ्युम वापरतो. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या दुःखी आणि वाईट आठवणी मिटवण्यासाठी, नवीन आठवणींना मनात जागा द्या. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावे लागेल, तसेच वेगवेगळ्या व्यक्तींना भेटावे लागेल. स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी किंवा स्वतःच्या आयुष्यात नव्याने आनंद आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ शकतो. परफ्युम डे १७ फेब्रुवारीला साजरा होतो.
४. फ्लर्ट डे
हा दिवस खास सिंगल मंडळींसाठी असतो. सिंगल व्यक्तींना जर कुणी आवडत असले किंवा कुणावर ‘क्रश’ असेल, तर या फ्लर्ट डे निमित्त ते त्यांच्याशी बोलू शकतात. मनातील भावना व्यक्त करून सांगू शकतात. हा दिवस १८ फेब्रुवारीला साजरा होतो.
५. कन्फेशन डे
तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल आणि अजूनही तुम्ही त्यांना सांगितले नसल्यास, कन्फेशन डेनिमित्त सांगू शकता. तसेच एखाद्याला तुम्ही कधी काही रागाने बोलून त्यांचे मन दुखावले असल्यास, त्याबद्दल तुम्ही माफीदेखील मागू शकता. कन्फेशन डे १९ फेब्रुवारीला साजरा होतो.
६. मिसिंग डे
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी व्यक्ती असते जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते; पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते. त्यांची कमतरता सतत जाणवते असते. त्यांची आठवण येत असते. तुमच्याही आयुष्यात अशी व्यक्ती असल्यास, या मिसिंग डेनिमित्त तुम्ही तुमच्या या भावना, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. हा दिवस २० फेब्रुवारीला साजरा होतो.
७. ब्रेकअप डे
प्रत्येक नातं, रिलेशनशिप हे तुमच्यासाठी चांगले असतेच असे नाही. त्यामुळे तुम्ही रिलेशनशिपमध्ये सुखी, आनंदी नसल्याचे सांगून, त्या नात्यामधून बाहेर पडू शकता. असे या अँटी व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात शेवटच्या दिवशी म्हणजे ब्रेकअप डे दिवशी केले जाऊ शकते. हा दिवस या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि तो २१ फेब्रुवारीला साजरा होतो. अशी सर्व माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.