तंत्रज्ञानाच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. अॅपलने आज(दि.10) कॅलिफॉर्नियामध्ये एका इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Apple iPhone 11 लाँच करण्याची दाट शक्यता आहे. तसंच, आयओएस 13 चं देखील अनावरण केलं जाण्याची शक्यता आहे.
कॅलिफॉर्नियातील अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण केले जाईल. यावेळी आयफोन 11 च्या मालिकेअंतर्गत कंपनी तीन नवे आयफोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लाँच करेल अशी चर्चा आहे. नव्या आयफोनमध्ये लेटेस्ट A13 चिपसेट असण्याची शक्यता आहे. नव्या आयफोनमध्ये कोणते फीचर्स असतील याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. पण यामध्ये फेस आयडीला सपोर्ट करणारा 6.1 इंचाचा LCD किंवा OLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, मल्टी अँगल फेस आयडी सेंसर असण्याची शक्यता आहे. नवीन आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टसह कंपनी जुन्या 3D टच टेक्नॉलॉजीऐवजी हॅप्टिक टच टेक्नॉलॉजीचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किंमत –
नवीन आयफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत जवळपास 53 हजार 700 रुपये असू शकते. लाँच झाल्यानंतर भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. पण, अमेरिकेमध्ये 13 सप्टेंबरपासून या फोनसाठी आगाऊ नोंदणी सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल, अशी चर्चा आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग –
कॅलिफॉर्नियातील अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास या इव्हेंटला सुरूवात होईल. हा लाइव्ह इव्हेंट iOS 10 किंवा त्यावरील आयओएसवर चालणाऱ्या आयपॅड, आयफोन आणि आयपॉड टचसह मॅक कम्प्युटरवर सफारी ब्राउझरद्वारे पाहता येईल. ‘विंडोज’चे वापरकर्ते लाइव्ह स्ट्रीमिंग Edge ब्राउझरद्वारेही पाहू शकतात. तसंच, ट्विटर आणि युट्यूबद्वारेही हा इव्हेंट लाइव्ह पाहता येईल.