अॅपल कंपनीने नव्या मॅकबुक एअर मॉडेलची नवीन आवृत्ती आणि फेस आयडीसह अनेक उत्तम फिचर्स असलेला नवा आयपॅड प्रो लाँच केला आहे. तसंच मॅक मिनी आणि मॅक पेन्सिलही कंपनीने सादर केली. न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन अॅकेडमी ऑफ हॉवर्ड गिलमॅनच्या ओपेरा हाउसमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये कंपनीने ही उपकरणं लाँच केली.

अॅपल मॅकबुक एअरमध्ये आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक नव्या फिचर्सचा समावेश आहे. यामध्ये रेटिना डिस्प्ले, टच आयडीच्या माध्यमातून बायोमॅटीक ऑथेंटिकेशन प्रणालीचा समावेश आहे. हा कमी वजनाचा कमी जाडीचा डिस्प्ले असलेला लॅपटॉप आता आणखी हलका झाला आहे. यामध्ये आता टचआयडीचा (फिंगरप्रिंट स्कॅनर) समावेश करण्यात आला आहे. वजन केवळ 1.34 किलो आहे. इंटेलच्या आठव्या पिढीतील प्रोसेसर, 16 जीबीपर्यंत रॅम, 1.5 टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय यात आहे.एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 12 तासांचा बॅकअप देईल असा दावा कंपनीने केला आहे. अद्ययावत कि-बोर्ड देण्यात आला असून कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाईप-सी, थंडरबोल्ट पोर्ट आदी पर्याय आहेत. याच्या विविध व्हेरिअंटची किंमत 1,14,900 रुपयांपासून सुरू होत आहे. 7 नोव्हेंबरपासून भारतात याची विक्री सुरू होत आहे.

आयपॅड प्रो (2018) या नव्या टॅबलेटलाही लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये यंदा होम बटनचा समावेश करण्यात आलेला नाही. यातील सर्वात आकर्षक फिचर म्हणजे फेस आयडी. हे फिचर अनेक आयफोनमध्ये असलं तरी पहिल्यांदाच या फिचरचा समावेश आयपॅडमध्ये करण्यात आला आहे. पुढील बाजूला असलेल्या 12 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे फिचर वापरता येईल. याच्या मागील बाजूला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 64 जीबी ते 1 टीबीपर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. याच्या विविध व्हेरिअंटची किंमत 71 हजार 900 रुपयांपासून पुढे आहे. याशिवाय कंपनीने अॅपल पेन्सिल देखील सादर केली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. याद्वारे नोट्स घेणं सहजसोपं होणार आहे. 10 हजार 900 रुपयांपासून पुढे या पेन्सिलची किंमत आहे. याशिवाय मॅक मिनी हा छोट्या आकाराचा मिनी कॉम्प्युटर आता आणखी स्मार्ट झाला आहे. यामध्ये आता 4/6 Core इंटेल प्रोसेसर्सचा समावेश करण्यात आलेला आहे, 75 हजार 900 रुपये इतकी याची किंमत असेल.