भारतात Apple iPad Pro (2018) साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. 16 नोव्हेंबर पासून भारतात नव्या ‘आयपॅड प्रो’ची विक्री सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी न्यू यॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने 11 इंच आणि 12.9 इंचाचे मॉडेल लाँच केले होते. हे दोन्ही मॉडेल 64 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1टीबी अशा व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असणार आहेत.
11 इंचाच्या बेसिक व्हेरिअटंची भारतातील किंमत 71 हजार 900 रुपयांपासून पुढे आहे. तर 12.9 इंचाच्या मॉडेलची किंमत 89 हजार रुपयांपासून पुढे ठेवण्यात आली आहे. अॅपलचे दोन प्रिमीयम रिसेलर Maple Store आणि Unicorn Store वर आगाऊ नोंदणीसाठी सुरूवात झाली आहे. यासोबत सेकंड जनरेशन अॅपल पेन्सिलची किंमत 10 हजार 990 रुपये आहे. अॅपल पेन्सिलमध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. याद्वारे नोट्स घेणं सहजसोपं होणार आहे. दोन्ही मॉडेल्सवर इएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. किमान 3 हजार 183 रुपये प्रतिमहीना असा इएमआय असू शकतो. सिटी बँक आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे.
नव्या आयपॅडमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले असून iPhone XR प्रमाणे मास्किंग तंत्रज्ञानाचाही वापर यात करण्यात आला आहे. यामध्ये यंदा होम बटनचा समावेश करण्यात आलेला नाही. यातील सर्वात आकर्षक फिचर म्हणजे फेस आयडी. हे फिचर अनेक आयफोनमध्ये असलं तरी पहिल्यांदाच या फिचरचा समावेश आयपॅडमध्ये करण्यात आला आहे. पुढील बाजूला असलेल्या 12 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे फिचर वापरता येईल. याच्या मागील बाजूला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.