स्मार्टफोनमधील अ‍ॅपमुळे मानसिक आजारांवर उपचारास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. अ‍ॅपच्या सुलभतेमुळे एकाच वेळी लाखो जणांना या अ‍ॅपची मदत मिळू शकते, असा दावाही अभ्यासकांनी केला आहे.

औदासीन्य हा प्रचलित मानसिक आजार असून जगभरात या आजाराचे रुग्ण आढळतात. मानसिक आजारांवरील उपचारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जगभरातील मानसिक आरोग्य उपचार संस्थांना संघर्ष करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय पूरक औषध संस्था आणि अमेरिकेतील हॉर्वर्ड मेडिकल स्कूल येथील संशोधकांनी स्मार्टफोनमधील अ‍ॅप मानसिक आजार कमी करत असल्याचे म्हटले आहे.

संज्ञात्मक वर्तणुकीशी संबंधित अ‍ॅप मानसिक आजारांवर नियंत्रण ठेवत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. लोकांना त्यांच्या मानसिक आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्टफोनची मदत होते, असे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय पूरक औषध संस्थेतील जेरम सॅरिस यांनी म्हटले आहे.

स्मार्टफोनमधील अ‍ॅप औषधाप्रमाणे काम करतात. त्यामुळे मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले जाते, असेही सॅरिस म्हणाले. स्मार्टफोनमधील अ‍ॅपआधारित मानसिक उपचारांचा अभ्यास करून संशोधकांनी याबाबतची आकडेवारी मांडली आहे. संशोधकांनी १८ ते ५९ या वयोगटातील ३,४०० पुरुष आणि महिलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास केला. नैराश्य, चिंता, उदासीनता, निद्रानाश असे विविध मानसिक आजार या लोकांना असल्याचे स्पष्ट झाले. स्मार्टफोनमधील अ‍ॅपमुळे या रुग्णांतील काही जणांच्या प्रकृतीत सुधारणा संशोधकांनी नोंदविली आहे.

Story img Loader