सामान्यपणे आजार म्हणेज सर्दी-खोकला आणि फारतर ताप हे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. मात्र हल्ली स्मार्टफोनचा स्मार्टपणे वापर न केल्याने होणाऱ्या आजारांची संख्या वाढली आहे. स्मार्टफोनच्या अती वापराने होणाऱ्या आजारांबद्दल जाणून घ्या…
नोमोफोबीया
फोन आपल्याजवळ नाही हे कळाल्यावर येणारी अस्वस्थता, फोन वाजल्याचा भास होणे, फोन न दिसल्यास भीती वाटणे असे वारंवार होत असल्यास तुम्हाला नोमोफोबीया झाल्याचे समजावे. नोमोफोबिया हा पुरुषांपेक्षा माहिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
लक्षणे – घाबरणे, मोबाईल वाजल्याचा भास होणे, मोबाईल व्हायब्रेट झाल्यासारखे वाटणे, मोबाईल नजरेआड गेल्यास अस्वस्थता येणे
सतर्कता – मोबाईलपासून ठरावी काळानंतर ब्रेक घेत जा, मोबाईलचे व्यसन लावून घेऊ नका.
स्मार्टफोन थम्ब
फेसबुक लाईक पासून ते मेसेज टाइप करणे, गेम्स खेळणे, फोटो पाहणे यासारख्या सर्वच गोष्टींसाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे दिवसभर सरासर फिरणा-या अंगठ्याच्या हाडाला कायमची इजा होणे, अंगठाच्या टोकावरील संवेदना नष्ट होण्यासारखे आजार मोबाईलच्या अती वापरामुळे होतात.
लक्षणे– अंगठ्याची संवेदना कमीकमी होत जाणे, अंगठ्याच्या तळाला (जिथे तो तळहाताला जोडला जातो) हाड दुखणे, अंगठा वाकवताना त्रास होणे, अंगठ्याची पेरे दुखणे
सतर्कता – कमीत कमी चॅटिंग करा, जास्त बोलायचे असल्यास थेट फोन करा, सतत एकाच हाताने टायपिंग करणं टाळा.
सेल फोन एल्बो
या आजारामध्ये फोनवर बोलताना किंवा चालताचालता टाईपिंग करताना बऱ्याच वेळ हात एकाच स्थितीत ठेवल्याने हातामधील स्थायूंच्या संवेदना क्षीण होतात. या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून यात तरूणांची संख्या मोठी आहे.
लक्षणे – कोपर दुखणे, फोन वापरताना हाताला मुंग्या येणे, सतत क्रॅम्प येणे
सतर्कता – जास्त वेळ फोनवर बोलताना इअरफोनचा वापर करा. तासंतास टाईपिंग करू नका.
टेक्स्ट नेक
सतत काय मोबाईलमध्ये डोकावत असतो, या प्रश्नाला ठोस उत्तर नाहीये. मात्र सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्याने मान तसेच मणक्याला कायमची इजा होऊ शकते.
लक्षणे – मान दुखणे, पाठीला त्रास होणे
सतर्कता – खांद्याचा आधार घेत मान वाकडी करून कानजवळ फोन पकडून बोलणे टाळा, आडवे पडून मेसेज करणे टाळा, चालताना टाईपिंग करू नका.
डिजीटल आय स्ट्रेस
फोनच्या सततच्या वापराने बुबुळांवर ताण येतो. अनेकदा आपण स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांच्या पापण्याच मिटत नाही. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. अनेकजण डोळ्यांना होणारा त्रासाला स्मार्टफोनच्या वापराशी जोडत नाहीत, मात्र स्मार्टफोन हा सध्या डोळ्यांच्या आजाराचे मुख्य कारण आहे.
लक्षणे – डोळ्यावर ताण येणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अंधूक दिसणे तसेच अनेकदा डोके दुखण्यापर्यंत हा त्रास जाऊ शकतो
सतर्कता – स्क्रीन एक्स्पोजर टाइमिंग कमीत कमी ठेवण्याकडे युझर्सने लक्ष देणे गरजेचे आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे बघताना १६ इंचाच्या आसपास अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.
या आजारांशिवाय सतत गाणी ऐकल्याने कानांवर परिणाम होणे, डोके दुखणे यासारखे आजारही फोनच्या अती वापरामुळेच होतात. याशिवाय फोनशी संबंधीत मानसिक आजारही काळजीचाच विषय आहे. त्यामुळे फोन वापरताना मर्यादा निश्चीत करणे गरजेचे आहे.