‘मला ना सारखं तोंड येतं. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की गरम काही पिता येत नाही’. ही समस्या सर्वसामान्य असली तरीही विशेषतः तरुणांमध्ये ती जास्त प्रमाणात आढळते. या तोंड येण्यामध्येही बरेच प्रकार आहेत. या समस्येबाबत योग्य ती माहिती नसल्याने त्याबाबत बरेच गैरसमज आढळून येतात. मात्र हे गैरसमज वेळीच दूर करुन आवश्यक ते उपचार करणे महत्त्वाचे असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास मात्र तोंड येण्याचा त्रास वाढू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गैरसमज
१. तोंड आले म्हणजे अंगातील उष्णता वाढली

– तोंड येण्याचे अनेक प्रकार आहेत. साधा संसर्ग होणे, खाताना तोंडातील त्वचा किंवा जीभ चावली जाणे, जखम होणे. याशिवाय अॅलर्जीसारख्या साध्या कारणापासून ते कर्करोगासारख्या भयानक आजारापर्यंत अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे उष्णता वाढणे हे तोंड येण्याचे एकमेव कारण नाही.

२. जीवनसत्त्व वाढण्यासाठी औषधे घेतली की तोंडातील जखम बरी होते.

– कोणत्याही समस्येवरील उपचार हे त्याच्या कारणावर अवलंबून असतात. ब जीवनसत्त्वाची कमतरता हे तोंड येण्याचे एक महत्त्वाचे कारण असले तरीही केवळ त्या एकाच कारणाने तोंड येते असे नाही. तसेच सर्वांमध्येच जीवनसत्त्व ब ची कमतरता असते असे नाही. त्यामुळे हे कारण सरसकट लागू होत नाही. तसेच नेमके कारण समजावून घेऊन मगच उपचार करणे सोयीचे ठरते.

३. तोंड येणे हा किरकोळ आजार असून तो आपोआप बरा होतो.

– सर्वसामान्यपणे तोंडातील जखमा ७ ते १५ दिवसांत बऱ्या होतात. परंतु वारंवार तोंड येणे, अनेक महिने जखम भरुन न येणे, असह्य वेदना यांपैकी कोणतीही लक्षणे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उपचार

१. तोंड आल्यास नेमका कोणाचा सल्ला घ्यावा?

– सुरुवातीला आपण तोंड येण्यावर काही घरगुती उपाय करतो. मग जवळच्या मेडिकलमधून औषधे आणून बरे होते का पाहतो. अगदीच नाही बरे वाटले तर आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जातो. मात्र सातत्याने त्रास होत असेल तर त्यामागील नेमके कारण समजून घेणे आवश्यक आहे. हे नेमके कारण मुखरोगनिदानतज्ज्ञ सांगू शकतो. हे लोक तोंडाच्या विकारांमध्ये तज्ज्ञ असल्याने त्यांना नेमके कारण पटकन लक्षात येऊ शकते.

२. घरगुती उपचार

साधारणपणे तोंड आलेल्या ठिकाणी तूप, मध, कोरफड लावल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. पण या उपायांनंतरही बरे न वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तोंड स्वच्छ राहील याची काळजी घ्यायला हवी. खाल्ल्यानंतर ब्रश करणे आवश्यक आहे. कोमट पाण्याच्या गुळण्या हाही तोंड स्वच्छ ठेवण्याचा उत्तम उपाय आहे.

डॉ. प्रियांका साखवळकर, तोंडाचे विकारतज्ज्ञ

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you suffering from mouth infection problem follow this things
Show comments