Money plant care tips: विविध रोपटी, झाडं घराच्या सौंदर्यात भर घालतात. अनेक जण ऑफिसचे टेबलही सुंदर रोपांनी सजवतात; ज्यात मनी प्लांटला सर्वाधिक पसंती दिली जाते. मनी प्लांटची काळजी घेणे खूप सोपे आहे आणि ही वनस्पती मातीशिवाय पाण्यातदेखील वाढू शकते. अशा परिस्थितीत ऑफिसमधील टेबल मातीने खराब होण्याचीही समस्या उद्भवत नाही. परंतु, कधी कधी घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर पाण्यात उगवणाऱ्या मनी प्लांटची पाने पिवळी पडू लागतात. पण,हे नेमके कशामुळे होते हे जर तुम्हाला ठाऊक नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मनी प्लांटला पुन्हा हिरवेगार बनवू शकता.
मनी प्लांट नेहमी टवटवीत आणि हिरवागार कसा ठेवायचा?
योग्य वेळी पाणी बदला
जर तुमचा मनी प्लांट पिवळा होत असेल, तर त्याचे मुख्य कारण मनी प्लांटचे पाणी असू शकते. जर पाणी योग्य वेळी बदलले नाही, तर मनी प्लांटच्या मुळांमध्ये बुरशी वाढू लागते; ज्यामुळे पाने पिवळी पडतात. थंडीत पाणी दूषित होण्याची शक्यता कमी असते. अशा परिस्थितीत तुम्ही आठवड्यातून एकदा झाडाचे पाणी बदलू शकता. त्याशिवाय उन्हाळ्यात मनी प्लांटचे पाणी दर पाच दिवसांनी एकदा बदलावे.
सर्व पाणी एकाच वेळी बदलू नका
जर पाणी खूप जुने नसेल, तर ते सर्व पाणी एकाच वेळी बदलू नका. फक्त अर्धे पाणी बदला आणि बाकीचे अर्धे तसेच ठेवा. असे केल्याने, मुळांच्या चांगल्या विकासासाठी आवश्यक ते पोषण कायम राखले जाते.
रोपांची छाटणी महत्त्वाची
रोपांची काळजी घेण्यासाठी रोपांची छाटणी करणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या मनी प्लांटवर बरीच वाळलेली पाने दिसली, तर ती तोडून बाजूला काढा. त्यामुळे तुमच्या वनस्पतीची वाढ चांगली होऊ शकते.
हेही वाचा: फळे, भाज्या अनेक दिवस फ्रिजमध्ये साठवून ठेवता? आजच व्हा सावध… नाहीतर उद्भवतील अनेक समस्या
बाटली स्वच्छ करा
मनी प्लांटबरोबरच बाटलीची साफसफाई करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्ही दर तीन दिवसांनी एकदा गरम पाण्याने बाटली धुऊन स्वच्छ करा. त्यामुळे आपल्या वनस्पतीमध्ये शेवाळ वाढण्याचा धोकाही कमी होतो.
सूर्यप्रकाशाची गरज
मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही काही वेळ ते सूर्यप्रकाशातही ठेवू शकता. त्यामुळे कोमेजणाऱ्या रोपालाही नवीन जीवन मिळू शकते.