झिका विषाणूच्या लागणीचे निदान करण्यात, तसेच त्यावरील उपचारांत साह्यभूत ठरू शकतील, अशा सहा कृत्रिम प्रतिपिंडांचा (अॅन्टिबॉडी) विकास करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या संशोधकांत एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या झिका विषाणूची लागण जगभरात १५ लाखांहून अधिक लोकांना झाली आहे.
याबाबत अमेरिकेतील लोयोला विद्यापीठातील रवी दुर्वसुला यांना सांगितले की, ही प्रतिपिंडे दोन प्रकारे उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्याद्वारे झिका विषाणूच्या उपप्रकाराची माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे या विषाणूजन्य रोगावर उपचार करण्यासाठीही त्यांचा पुढे विकास करता येईल.
झिकाचा प्रसार हा मुख्यत: डासांद्वारे होतो. याची लागण झालेल्या बहुसंख्य लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, किंवा अंगावर पुरळ, सौम्य ताप आणि डोळ्यांना लाली अशी सौम्य लक्षणे दिसून येतात. गर्भवतींना या विषाणूची लागण झाल्यास मात्र मृतावस्थेतील अर्भक जन्मास येणे, गर्भपात किंवा मायक्रोसिफलीसारखे अनेक जन्मदोष निर्माण होऊ शकतात, अशी माहिती लोयोला विद्यापीठातील संशोधन सहायक प्रा. अदिनारायण कुनाम्नेनी यांनी दिली. सध्या या विषाणूवर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही, असे ते म्हणाले. झिकाबाबत ‘प्लोस वन’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासलेखाचे ते वरिष्ठ लेखक आहेत.
प्रतिपिंड म्हणजे शरीराच्या प्रतिकार यंत्रणेने तयार केलेले वाय आकाराचे प्रथिन असते. जेव्हा रोगजंतू शरीरात प्रवेश करतात, तेव्हा त्यांच्याशी निगडित प्रतिजनूकांशी जोडून घेत हे जंतू प्रतिकार यंत्रणेद्वारे नष्ट करण्याचे काम प्रतिपिंड करतात. रायबोसोम डिस्प्ले तंत्राचा वापर करून संशोधकांनी तयार केलेली सहा कृत्रिम प्रतिपिंडे झिका विषाणूला बांधून ठेवण्याचे काम करतात. या प्रतिपिंडांच्या निर्मितीचा खर्च कमी असून त्यांचा वापर करून साध्या फिल्टर पेपर चाचणीने झिकाचे अस्तित्व सिद्ध करणे शक्य आहे.