मधुमेह टाळण्यासाठी अनेकदा वापरण्यात येणारे कृत्रिम गोड पदार्थ ( मधुरके ) व क्रीडा अन्न पूरके ही विषारी असतात व त्यामुळे आतडय़ातील जिवाणूंना ते घातक ठरतात असे संशोधनात दिसून आले आहे. जर्नल मॉलिक्युलस या नियतकालिकात म्हटले आहे की, अ‍ॅसपार्टेम, सुक्रॅलोज, सॅखरिन, निओटेम, अ‍ॅडव्हानटेम, अ‍ॅसेसलमफेम पोटॅशियम के व क्रीडा अन्न पूरक पदार्थ यात घातक ठरतात. आतडय़ात अनेक उपकारक जीवाणू असतात त्यांच्यासाठी हे पदार्थ विष असतात. मिलिलिटरला १ मिलिग्रॅम मधुरक पदार्थ (स्वीटनर) हाही घातक ठरतो. इस्रायलमधील नेगेव्ह विद्यापीठाच्या एरियल कुशमारो यांनी म्हटले आहे की, जैवप्रदीप्त इ कोलाय जीवाणूची सुधारित आवृत्ती घेऊन यातील विषारी घटक शोधण्यात आले. यात त्याचा वापर संवेदन प्रारूप म्हणून करण्यात आला.

कृत्रिम मधुरकांमुळे आतडय़ातील जीवाणू मारले जातात त्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. कृत्रिम मधुरके ही अन्नपदार्थ, शीतपेय यात वापरतात. लोकांना काही माहिती नसताना ते हे पदार्थ सेवन करतात. ही मधुरके प्रदूषित असून ती पिण्याच्या पाण्यात व भूजलातही सापडतात. कृत्रिम मधुरकांची विषमयता ही अधिक असते व त्यांचे खूप नकारात्मक परिणाम आतडय़ातील जीवाणूंवर होतात, असे कुशमारो यांनी सांगितले. यात प्रदीप्त जीवाणूंच्या मदतीने कृत्रिम मधुरकांचा होणारा परिणाम तपासण्यात आला.