नवे वर्ष कायम नवी स्वप्ने आणि आशा-आकांक्षा घेऊन येत असते. आता, दरवर्षीप्रमाणे यातील काही आकांक्षा पुऱ्या होतील, तर काही पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलल्या जातील. एका सर्वेक्षणानुसार, आजच्या तरुणांपैकी ६९ टक्के जणांना घर खरेदी करण्याची इच्छा आहे. घर खरेदी करणे ही फार मोठी गोष्ट असून त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावे लागते. तुम्ही पुढील वर्षी नवीन घर घेण्याचे नियोजन करत असाल तर आणि तुमच्याकडे त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याकरिता पुरेसे पैसे जमा झालेले नसतील, तर घाबरू नका! डाऊन पेमेंट करण्यासाठी तुम्ही कर्ज न घेताही जास्तीचे पैसे उभे करू शकता. आता आर्थिक ताण न येता सगळ्या गोष्टी कशा साध्य करायच्या यासाठी काही टीप्स…
बिल्डरला डाऊन पेमेंट करणे पुढे ढकला
तुम्ही नामवंत बिल्डरकडून घर खरेदी करता तेव्हा तुम्ही बिल्डरला डाऊन पेमेंटची मुभा देण्यासाठी विनंती करू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही तुमच्या डाऊन पेमेंटची रक्कम हप्त्याने किंवा बिल्डर आणि तुम्ही परस्पर संमतीने मान्य केलेल्या कालावधीमध्ये थोडी-थोडी करून भरू शकता. बिल्डर्स अशा योजना विशिष्ट बँकांबरोबर टाय-अप करून उपलब्ध करून देतात. अशाप्रकारे रक्कम भरण्याची सुविधा सर्वच बिल्डर्स आणि बँका देत नाहीत. म्हणून तुमचा बिल्डर काळजीपूर्वक निवडा.
तुमची सध्याची प्रॉपर्टी गहाण ठेवा
तुम्ही कर्ज मिळविण्यासाठी तुमची सध्याची प्रॉपर्टी गहाण ठेवू शकता. फक्त प्रॉपर्टीच नाही, तर तुम्ही तुमचे दागदागिने, मुदतठेवी आणि म्युच्युअल फंड यांवरही कर्ज घेऊ शकता. परंतु तुमच्या सर्व गुंतवणुकांची मुदतपूर्ती होत नसेल, तर त्या मोडू नका.
तुमच्या नोकरीच्या ठिकाणाहून कर्ज घेणे
थोड्या काळासाठी पैसे उभे करण्यासाठी कमी व्याजदराने किंवा बिनव्याजी पैसे उभे करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. काही कंपन्या तुम्हाला काही महिन्यांचा पगार कमी व्याजदरावर किंवा बिनव्याजी आगाऊ देतात. उसनी घेतलेली अशी रक्कम नंतर तुमच्या पगारातून दर महिन्याला कापून घेतली जाते. परंतु या रकमेवर तुमच्या टॅक्स ब्रॅकेटनुसार कर भरावा लागेल, कारण ती तुमच्या पगाराचाच एक भाग असते.
तुमच्या मर्यादेच्या आतच उसनवारी करा
तुम्ही जेव्हा थोड्या काळात पैसे उभे करण्याचा विचार करता आणि पैसे परत करण्याची तुमची योजना तयार असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन ते वेळीच परत करू शकता. समजा तुम्हाला बोनस मिळणार असेल किंवा काही महिन्यांनंतर तुमच्या गुंतवणुकीची मुदतपूर्ती होणार असेल, तर तुम्ही यांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी करू शकता.
गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या किंवा गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडे जा
राष्ट्रीयीकृत बँका नेहमीच तुमच्या मालमत्तेच्या किमतीच्या ८० टक्के पर्यंत कर्ज देतात, मात्र त्याउलट, गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या किंवा गैरबँकिंग वित्तीय कंपन्या मालमत्तेच्या किमतीच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. अशा प्रकारच्या कर्जाच्या रकमेत रजिस्ट्रेशन, स्टॅंप ड्युटी, फर्निशिंग, इत्यादींचा समावेश असतो, परंतु कर्जासाठीची पात्रता मात्र तुमची परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन ठरवली जाते.
आदिल शेट्टी,
सीईओ, बँकबझार