Applying Oil In Belly Button: थंडीमध्ये तेल- तूप हे अनेक घरांमध्ये मुख्य भूमिका बजावतात. अगदी आहारापासून ते त्वचेवर- केसाला लावण्यासाठी तेलाचा भरपूर वापर केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीत गार हवा हे शुष्क असते ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, केसाची गुणवत्ता खराब होणे, पचनाशी संबंधित तक्रारी जाणवणे अशा समस्या जाणवून येतात. या तीनही त्रासांवर स्निग्ध पदार्थांचा वापर हे उत्तम उत्तर ठरू शकते. तेलाचे आज बाजारात असंख्य प्रकार आहेत. आपल्या गरजेनुसार व बजेटनुसार या तेलाचा वापर केला जातो. पण वर्षानुवर्षे भारतात अनेक घरांमध्ये विविध कारणांसाठी वापरले जाणारे एक तेल म्हणजे मोहरीचे तेल. विशेषतः उत्तरेकडील भागांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. किमतीला सुद्धा परवडणारे असे हे तेल अनेक समस्यांवर उपाय ठरते. आज सुद्धा आपण मोहरीच्या तेलाचे काही खास फायदे बघणार आहोत.
तत्पूर्वी आपण या मोहरीच्या तेलाचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया. तुम्हाला आठवत असेल तर, लहानपणी कधी पोटात दुखलं की आई बेंबीमध्ये थेंबभर तेल टाकायची. अजूनही हा उपाय आपल्या चांगल्या कामी येऊ शकतो. केवळ पोटदुखीसाठीच नव्हे तर बेंबीला तेल लावण्याचे अन्यही फायदे आहेत. ते नेमके काय हे पाहूया..
बेंबीची स्वच्छता
बेंबी हा शरिरातील अतिशय लहान भाग असून यामध्ये मळ सहज जमा होऊ शकतो, अशावेळी बेंबीमध्ये तेल टाकल्यानं अनेक महिने साचलेला मळ वितळून स्वच्छ होतो.
अपचनावर उपाय
मोहरीच्या तेलात अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुणधर्म असतात. आयुर्वेदात सुद्धा या तेलाला महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार मोहरीचे तेल हे थोडे गरमच असते, जेव्हा हे तेल शरीरावर लावले जाते तेव्हा शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते. यामुळे पचनास हातभार लागतोच तसेच थंडी वाजण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
रक्तभिसरण सुधारणे
मोहरीच्या तेलाने शरीरात उष्णता वाढवल्याने रक्ताभिसरणाचा वेग सुद्धा सुधारण्यात मदत होते. रक्तातून शरीरातील विविध अवयवांना मिळणारे पोषण हे शरीराच्या एकूण विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणूनच अनेक घरांमध्ये लहान बाळाला या तेलाने मसाज सुद्धा केला जातो.
सांधेदुखीपासून आराम
थंडीच्या दिवसांमध्ये मांसपेशी व सांध्यांची दुखणी डोकं वर काढतात. विशेषतः वयानुरूप ज्यांचे सांधे अगोदरच कमकुवत झाले असतील त्यांना तर हा त्रास नेहमीच सहन करावा लागू शकतो. मोहरीच्या तेलातील उष्णतेमुळे या सांध्यांच्या दुखण्याला आराम मिळतो व स्नायूंवरील ताण सुद्धा कमी होऊ लागतो.
हे ही वाचा<< प्रसिद्ध अभिनेत्रीला धूम्रपान न करता फुफ्फुसांचा कर्करोग; कोणती लक्षणे आधी दिसतात, निदान कसे होते?
दरम्यान, योग आणि आयुर्वेदात असे मानले जाते की शरीराच्या चक्रामध्ये बेंबीला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच ते संतुलित ठेवण्यासाठी त्यावर तेल लावले जाते. बेंबीमध्ये तेल घातल्यानं मज्जासंस्था सुदृढ व संतुलित राहते.
तळटीप: मोहरीच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकण्याचे असंख्य फायदे जरी असले तरी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तसेच एकूण आरोग्य स्थितीनुसार तुमच्यावरील परिणाम बदलू शकतो, त्यामुळे कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.