स्त्रियांमधील स्तनाच्या कर्करोगास कारण ठरणाऱ्या रासायनिक घटकांची एक यादीच संशोधकांनी आता सादर केली आहे.
बहुतांश सर्वच देशांतील महिलांना ती लागू पडणारी आहे असे अमेरिकेच्या संशोधकांनी म्हटले आहे. एनव्हायर्नमेंटल हेल्थ परस्पेक्टिव्ह या नियतकालिकात या घातक रसायनांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, स्त्रियांनी या रसायनांपासून जपावे असा सल्लाही देण्यात आला आहे.
या रसायनांमध्ये गॅसोलिन, डिझेल, वाहनांतून बाहेर पडणारा धूर, अग्निशामक रसायने, कपडय़ावरील डाग रोखणारी रसायने, पेंट काढणारी रसायने, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी काही रसायने यांचा या घातक रसायनात समावेश आहे. सायलेंट स्प्रिंग इन्स्टिटय़ूट येथील संशोधक संचालक रूथान रूडेल यांनी म्हटले आहे, की या अभ्यासामुळे स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांना मार्गदर्शन मिळेल. बेंझिन व ब्युटाडाइन ही मोठी कर्करोगकारक रसायन आहेत, ती वाहनांचा धूर व जळालेल्या अन्नाच्या धुरात असतात, पिण्याच्या पाण्यातही ती असू शकतात. अमेरिकेतील प्रत्येक महिलेला या घातक रसायनांचा सामना करावा लागतो व त्यांच्यात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे असे सहलेखक ज्युलिया ब्रॉडी यांनी सांगितले. ब्रॉडी यांनी सांगितले, की र्सवकष असा हा शोधनिबंध असून त्यातून स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळते. त्यासाठी काही शिफारशी करण्यात आल्या आहेत.
वाहनातून बाहेर पडणारा धूर कमी करा, मोटार सतत बंद अवस्थेत ठेवू नका. तण काढण्यासाठी, पाने गोळा करण्यासाठी विजेवर चालणारी यंत्रे वापरा, स्वयंपाक करताना नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा, त्यामुळे तेलाचा धूर व जळालेल्या अन्नाचा घातक धूर बाहेर निघून जाईल. पॉलीयुरेथिन फोमचे फर्निचर वापरू नये, अग्निरोधक पदार्थ लावलेले फर्निचर घेऊ नका, कारण ती रसायने घातक असतात. कपडय़ांवरील डाग काढणारी रसायने वापरू नका, पेरक्लोरोएथिलिन नसलेले ड्रायक्लिनर वापरू नका किंवा ड्रायक्लिनिंग करू नका, कार्बन ब्लॉकवर आधारित जलशुद्धीकरण यंत्र वापरा. चपला, बूट यांनाही रसायने लावलेली असतात ती लांब ठेवा, काही वेळा व्हॅक्यूम-हेपा फिल्टर वापरून स्वच्छ करा. कर्करोग टाळण्यासाठी या काही बाबी पाळणे आवश्यक आहे.
या संशोधनाला अ‍ॅव्हॉन फाऊंडेशनने निधी दिला होता. द सायलेंट स्प्रिंग इन्स्टिटय़ूटने याबाबत २० वर्षे संशोधन करून स्त्रियांच्या कर्करोगावर संशोधन केले आहे.

Story img Loader